मुंबई : उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायूतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी भव्य रॅलीदेखील काढण्यात आली. दरम्यान, अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी बोरीवली येथील पुष्टिपती विनायक मंदिरात दर्शन घेतले.
याप्रसंगी लोकसभा अध्यक्ष आणि खासदार ओम बिर्ला, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, खासदार गोपाळ शेट्टी, भाजपचे मुंबई अध्यक्ष आणि आमदार आशिष शेलार, आमदार मनीषा चौधरी, आमदार योगेश सागर, आमदार प्रकाश सुर्वे तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हे वाचलंत का? - काँग्रेसचे 'पंजा' चिन्ह जाणार? मनसेची निवडणूक आयोगाकडे तक्रार
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "गेल्या दोन वर्षात राज्य सरकारने आणि दहा वर्षांत मोदीजींनी मुंबईत केलेलं काम लोकांसमोर आहे. त्यामुळे महायूतीने केलेल्या कामाची पोचपावती या निवडणूकीत लोक देतील आणि पीयूष गोयल यांना पूर्ण बहुमताने निवडून आणतील. पीयूष गोयलच नाही तर मुंबईतील सहाच्या सहा जागा महायूती मोठ्या फरकाने जिंकेल."
"मुंबईत शिवसेना आपले तिन्ही मराठी उमेदवार देणार आहे. पीयूष गोयल हे मुंबईकर आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आक्षेप घेण्याचा कुणालाही अधिकार नाही. ते प्रचंड बहुमताने विजयी होतील," असे ते म्हणाले. तसेच मुंबईतील उमेदवारांची यादी आज जाहीर होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.