स्वातंत्र्योत्तर काळातील भारताच्या बदलत्या सीमा

    03-Apr-2024
Total Views |
Nehru and India's changing borders
 
सशक्त विरोधी पक्षांच्या अभावी काँग्रेसने तब्बल पाच दशके देशावर निरंकुश राज्य केले. त्यामुळे आपल्याला जाब विचारणारे कोणी नाही, अशी समजूत त्या पक्षाच्या नेत्यांच्या मनात निर्माण झाली. पण, काळाचे चक्र फिरून, काँग्रेसपेक्षा समर्थ असा पक्ष सत्तेवर आल्यावर, काँग्रेसची पापे उघड पडली. देशाची सीमा केवळ फाळणीच्या वेळीच बदलली असे नव्हे, तर नंतरच्या काळातही भारताची सीमा काँग्रेसच्या कृपेने बदलती राहिली आहे.

काँग्रेसच्या हाती देश सुरक्षित आहे का, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विचारला. कारण, काँग्रेसने आपल्या सत्ताकाळात केलेले देशाचे तुकडे केवळ पाकिस्तानपुरतेच मर्यादित नव्हते. स्वातंत्र्यानंतरही भारताच्या भूमीचे लचके शेजारी देशांनी तोडले असून, त्यास केंद्रात सत्तेवर असलेले तत्कालीन काँग्रेस सरकारचे बोटचेपे आणि बेजबाबदार धोरणच कारणीभूत आहे. आजवर झाकून ठेवलेली काँग्रेसची ही काळी कृत्ये आता लोकांपुढे येत असल्याने, काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.पं. नेहरू यांनी केलेल्या धोरणात्मक चुका किती भयंकर होत्या, ते लक्षात घेतले पाहिजे. कारण, या चुकीच्या धोरणांचा परिणाम केवळ तात्कालिक नव्हता, तर तो पुढील दोन-तीन पिढ्यांना भोगावा लागला आणि देशाची मोठी हानी झाली. स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच काश्मीरच्या हक्कावरून पाकिस्तानने भारतावर हल्ला केला आणि बरीचशी काश्मिरी भूमी ताब्यात घेतली.

तेव्हा काश्मीरचे विलीनीकरण झाले आहे की नाही, याचा विचार न करता, जर नेहरूंनी देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी लष्करी कारवाई केली असती, तर पाकव्याप्त काश्मीर निर्माणच झाले नसते. पण, पाकिस्तानला काश्मीरचा काही भाग मिळवून देण्यात, नेहरूंच्या धोरणाचाच प्रमुख भाग होता, हे आता दिसून येते (‘आर्टिकल ३७०’ या चित्रपटाचा प्रारंभच या कथनाने होतो). नंतर लष्कराला पाचारण केले, तोपर्यंत व्हायचे ते नुकसान होऊन गेले होते. देशाच्या फाळणीला गांधी-नेहरू यांचे धोरणच जबाबदार होते. पण, भारताचा नकाशा केवळ फाळणीच्या वेळीच बदलला असे नव्हे, तर नंतरच्या काँग्रेसच्या कारकिर्दीतही तो बदलत राहिला. पुढे काश्मीरला ’३७० कलमा’द्वारे विशेष दर्जा देण्यात आला. त्याची काय आवश्यकता होती, ते ना कधी नेहरूंनी सांगितले, ना काँग्रेसने स्पष्ट केले. या अलगतेचे विष काश्मिरी जनतेत भिनविले, तरी त्याचे दुष्परिणाम सार्‍या देशाला भोगावे लागले.
 
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, केवळ दोनच वर्षांतच चीनने तिबेटवर आक्रमण केले आणि तो देशच गिळंकृत केला. त्याला ना तत्कालिन सोव्हिएत रशियाने विरोध केला, ना अमेरिकेने. पण, भारतानेही केवळ बघ्याचीच भूमिका घेतली. तेव्हा चीन आजच्याइतका शक्तिशाली नव्हता. किंबहुना, भारत त्यापेक्षा काही अंशी अधिकच शक्तिमान होता. भारताने चीनला विरोध केला असता किंवा या आक्रमणाविरोधात आवाज उठविला असता, तर कदाचित चीनला तिबेट गिळणे इतके सोपे गेले नसते. पण, नेहरूंवर चीनप्रेमाची जी नशा चढली होती, तिने चक्क एका देशाचा बळी घेतला. पुढे तर तिबेट हा चीनचाच अविभाज्य प्रदेश आहे, अशी अधिकृत भूमिका नेहरू यांनी घेतली. चीनने भारतावर आक्रमण करून, अक्साई चीन ताब्यात घेतल्यावरही, भारताच्या तिबेटविषयक भूमिकेत काहीही बदल झालेला नाही, हीसुद्धा आश्चर्यकारक गोष्ट. ही भूमिका दुर्दैवाने आजही कायमच आहे. भारताच्या या कणाहीन भूमिकेमुळेच चीन आजही सीमेवर कुरापती काढण्याचे धाडस करू शकतो आणि अरुणाचल प्रदेशावर आपला दावा करू शकतो. भारताने तिबेट आणि तैवान यासंदर्भात आपली अधिकृत भूमिका बदलली आणि त्यांना स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिल्यास चीनच्या पायाखालची जमीन सरकेल.

नेहरू यांच्या कन्येनेही भारत ही आपली खासगी मालमत्ता असल्याच्या थाटात तामिळनाडूजवळचे कच्चाथीवू हे बेट श्रीलंकेला आंदण देऊन टाकले. हे बेट भारताच्या मालकीचे होते आणि ब्रिटिश राजवटीतही त्याची मालकी भारताकडेच होती. अशा स्थितीत इंदिरा गांधी यांनी हे बेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय का घेतला, ते अनाकलनीय आहे. कारण, त्यामुळे श्रीलंकेची सागरी सीमा भारताच्या उंबरठ्याजवळ येऊन ठेपली असून, त्या भागातील समृद्ध सागरी संपत्तीवरही श्रीलंकेचा हक्क प्रस्थापित झाला आहे. काँग्रेसच्या या ढिल्या धोरणामुळे नेपाळसारख्या किरकोळ देशानेही मध्यंतरी कालापानी या प्रदेशावरून भारताशी सरहद्दीचा नवा वाद निर्माण केला आहे.काँग्रेसची कृष्णकृत्ये दिवसेंदिवस सामान्य जनतेसमोर उघड होत असल्याने, या पक्षाचा जनाधार झपाट्याने घटत चालला आहे. देशाची सत्ता हाती येण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चालल्याचे लक्षात आल्यानेच, काँग्रेसच्या नेत्यांमध्ये विलक्षण नैराश्य आणि अस्वस्थता पसरली आहे. मोदी सरकार आपली काळी कृत्ये जगापुढे आणून, आपल्याला न्यायालयापुढे उभे करतील, या भीतीपोटीच राहुल गांधी यांच्यासारख्या नेत्यांनी देशात अराजक माजविण्याची भाषा केली आहे.
 
स्वातंत्र्यानंतर देशात काँग्रेसला विरोध करणारा समर्थ पक्ष आणि पं. नेहरू यांच्यासारखे वलय आणि करिष्मा असलेला विरोधी नेता नव्हता. स्वातंत्र्य आंदोलनामुळे जनतेत काँग्रेसबद्दल प्रेम होते. परिणामी, देशावर पाच दशके काँग्रेसची निरंकुश सत्ता राहिली. पण, या सत्तेच्या काळात तत्कालीन नेतृत्वाने भारताची सरहद्द कायम राखण्यात फारच ढिसाळपणा दाखविला. अक्साई चीनसारखा प्रचंड मोठा प्रदेश चीनच्या घशात गेला, तो नेहरू यांच्या बोटचेप्या नेतृत्वामुळेच. आज काँग्रेसचे काही बिनडोक आणि निर्लज्ज नेते मोदी यांना लडाखमधील गलवान खोर्‍यात चीनने केलेल्या कथित अतिक्रमणावर प्रश्न विचारीत आहेत. गलवान खोर्‍यात चिनी सैन्याला आत घुसताच आले नाही. भारताच्या २५ जवानांनी प्राणांची बाजी लावून, ते आक्रमण परतवून तर लावलेच; पण ते करताना, चीनच्याही सुमारे ४० जवानांचे प्राण घेतले. गलवान खोर्‍यातील या न झालेल्या घुसखोरीवर एक शब्द काढण्यापूर्वी मनमोहन सिंग यांच्या काळातच चीनने हिमाचल प्रदेश आणि लडाखमध्ये केलेल्या घुसखोरीचा जाब काँग्रेसने दिला पाहिजे. तसेच पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीनचाही हिशेब द्यावा लागेल. म्हणूनच काँग्रेसच्या हाती देश सुरक्षित आहे का, हा प्रश्न मोदी यांनी उपस्थित केला आहे. ज्याचे उत्तर काय आहे, ते सार्‍या भारतीयांना ठाऊक आहे.

राहुल बोरगांवकर