मुंबई तरूण भारत विशेष: मनमोहन सिंगांनी कमावले काँग्रेसने घालवले!

आज माजी पंतप्रधान मनमोहनसिंग राज्यसभेत ३३ वर्षांनी निवृत्त होत आहेत त्याबद्दल घेतलेला हा थोडक्यात आढावा घेणारा लेख….

    03-Apr-2024
Total Views |

Manmohan Singh
 
 
मोहित सोमण
 
आज ३३ वर्षाच्या कारकीर्दीनंतर देशाचे माजी पंतप्रधान मनमोहनसिंग हे आज राज्यसभेतून निवृत्त होत आहेत. १९९१ पासून सलग राज्यसभेत त्यांनी योगदान दिले आहे. आज त्यांच्या कारकीर्दीचा अखेरचा दिवस ! खर तर आज त्यांची निवृत्ती, त्यांनी देशासाठी दिलेले अर्थविषयक योगदान शब्दात न सांगता येणारे ! नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून कारभार हाती घेत अर्थव्यवस्थेचे आधुनिकीकरण केले. अर्थव्यवस्थेची कवाडे जगासाठी उघडत देशात जागतिकीकरण, उदारीकरण व खाजगीकरण या तीन तत्वावर देशाची गाडी रुळावर आणली.
 
त्यापूर्वी भारत हे गुंतवणूकीसाठी प्राधान्य असलेल्या देशांच्या यादीत खीजगणीतही नव्हते. किंबहुना तो काळ ' लायसन्स राज ' चा काळ म्हणून ओळखला जात असे. भारतात गुंतवणूक करणे हे भीक नको पण कुत्रा आवर या रीतीने भारताकडे गुंतवणूकदार पाठ फिरवत. एक व्यवसाय उघडण्यासाठी शंभर कागदपत्रे लागताना दोनशे रूपयांचा वस्तूंवर हजार रुपयांचा कर ,या परीस्थितीत सुत्रे हाती घेत मनमोहनसिंग यांनी देशासाठी महत्वाचे निर्णय घेतले. १९९१ साली अवास्तव कागदपत्रांचे महत्व कमी करत उद्योगांना ऑक्सिजन देण्याचे काम केले.
 
यापूर्वी याच बंधनांमुळे समग्लर लोकांचे फावले होते. मनमोहनसिंगाही अवाढव्य कर कपात केल्याने आयात निर्यातीत कुख्यात तस्करांचे कंबरडे मोडले. इमान इतबारे नोकरी व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगले दिवस आले त्याचे श्रेय कोणाला जात असेल तर ते डॉ मनमोहन सिंग यांना...
 
उदारीकरणाच्या काळात अनेक परदेशी उद्योगधंदे भारतात येऊ लागले, समृद्ध भारताची ही नांदी सुरू झाली. गुंतवणूकदारांना देशावरील अर्थव्यवस्थेवर भरोसा निर्माण झाला. गुंतवणूकदारांना रेड कार्पेटवर चालण्याची संधी मिळाली. या जागतिकीकरणाच्या काळात अनेक उद्योगांनी आपली उत्पादने भारतात सुरू केली.९० मधील दशकात मोबाईल नुकताच येण्याच्या मार्गावर होते.डिजिटल क्रांतीचा पाया याच काळात रोवला गेला. उदारीकरण नसते तर या गोष्टी घडल्याच नसत्या. असे असताना प्रश्न पडत़ो काँग्रेसने काय केलं?
 
काँग्रेसने त्यांना २००४-२०१४ या कार्यकाळात पंतप्रधान तर केले पण या मनमोहन सिंग यांच्या विद्वत्तेचा ' शून्य ' वापर केला किंबहुना त्यांच्या काळात त्यांनाच अंधारात ठूवत काँग्रेसने निर्णय घेतले होते हे संजय बारु यांच्या ' द एक्ससिडेंटल प्रायमिनिस्टर ' या पुस्तकात नमूद केलेले आहे. पण असे का घडले त्याचा धांडोळा घेणे महत्वाचे आहे.
 
मनमोहनसिंगांसारखे स्वच्छ चारित्र्याचे व उच्चविद्याविभूषित पंतप्रधान असताना काँग्रेसच्या काळात ९ वर्षात ९ घोटाळे उघडकीस आले. त्यांच्याच मंत्रीमंडळातील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले कोळसा घोटाळा (२०१२) २ जी स्पेक्ट्रम घोटाळा (२००८) हेलिकॉप्टर घोटाळा (२०१२) ट्रक घोटाळा (२०१२) सीडब्लूजी घोटाळा (२०१०), कॅश फॉर वोट घोटाळा (२०११) आदर्श घोटाळा (२०१२), आयपीएल घोटाळा (२०१३) , सत्यम घोटाळा (२००९) इतके घोटाळे होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कडक कारवाई तडीस नेली गेली नाही.
 
मात्र भारत युएस न्युक्लिअर डील विरोधात काँग्रेसचे युपीए प्रणित सरकार पाडण्याचे कम्युनिस्टांनी षडयंत्र रचले त्या काळात मात्र 'तोडपाणी करण्यात काँग्रेस यशस्वी ठरली. परंतु मूळ प्रश्न हा पडतो की काँग्रेसच्या काळात मनमोहनसिंहांच्या काळात त्यांच्या नाकाखालून अनेक घोटाळे घडले त्यात १० जनपथचा काय नेमका रोल होता हा प्रश्न नक्कीच पडण्यासारखा आहे. उतरत्या काळात मनमोहनसिंग वयानुसार थकले तरी त्यांनी राज्यसभेत काम सुरु ठेवले मात्र त्यांनी काँग्रेसवर ,संजय बारू यांच्या पुस्तकावर बोलण्याचे नेहमी टाळले. हे टाळलेले बोलणेच खूप काही सांगून जाते.
 
राजीव गांधींच्या काळात बोफोर्स प्रकरणात आरोपांची राळ उडाली होती. तो इतिहास २०१४ पर्यंत कायम राहिला. ते घोटाळे सिद्ध झाले की नाही हा भाग वेगळा परंतु काँग्रेसच्या काळात पद कुठलेही असो कारभार एकाच व्यक्तीच्या हातात होता त्याची फळेही काँग्रेस भोगत आहे. नरसिंहराव यांच्या सरकारनं तर जशी काँग्रेसला उतरती कळा सुरू झाली त्यानंतर मनमोहनसिंग यांची सरकारमधील भूमिका कमी होत गेली.अटलबिहारी वाजपेयी यांचे अनपेक्षितपणे सरकार पडल्यानंतर मनमोहन सिंग यांना मोठ्या कामगिरीची संधीही होती ती त्यांनी निभावलीही असती परंतु या मा बेटा यांच्या राजकारणामुळे व खिचडी सरकारमुळे युपीए २ मध्ये मनमोहनसिंग यांना अपेक्षित प्रभाव पाडता आला नाही. हा दोष मनमोहनसिंग यांचा नसून काँग्रेस पक्षाचा आहे असे खरं तर म्हणावे लागेल.
 
आज मागे वळून पाहताना काँग्रेसकालीन सरकारचे १.८६ लाख कोटींचा कोळसा घोटाळा, २ जी स्पेक्ट्रमचा १.७६ लाख कोटींचा घोटाळा, हेलिकॉप्टरचा ३६०० कोटींचा घोटाळा, ट्रकमधील १४ कोटींचा घोटाळा, सीडब्लूजीचा ९० कोटींचा घोटाळा ,पैशाच्या बदल्यात मत घोटाळा,आदर्श घोटाळा इतक्या घोटाळ्यात देशाच्या नुकसानाची जबाबदारी तत्कालीन सरकार घेणार आहे का मनमोहनसिंग यांची माफी मागत काँग्रेस हायकमांड यांचे प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे का? हे प्रश्न पडतात.
 
मनमोहनसिंग यांच्या दैदिप्यमान कामगिरीतूनही घोटाळ्यांचा प्रश्न घरघर करणारा आहे. आधुनिकतेचे जनक म्हणून मनमोहनसिंग यांचे नाव घेतले तरी काँग्रेसचा भूतकाळ कसा विसरता येणार ? आज अनेक मान्यवर राज्यसभेतून आपला निरोप घेतील. मनमोहनसिंग यांच्या खेरीज अनेक मान्यवर आज निवृत्त होतील तर सोनिया गांधी प्रथमच राज्यसभेत जाणार आहेत. या संदर्भात तर भाजपने काँग्रेसच्या घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढली होती. १० वर्षात ९ ते १० घोटाळ्याचे आरोप असलेल्या काँग्रेस सरकार कुठल्या उजळ माथ्याने मनमोहनसिंग यांना 'फेअरवेल 'पार्टी देऊ शकणार आहे?
 
सामान्य माणसाला पडलेला प्रश्न म्हणजे एक सामान्य व्यक्ती चहा विकून संघर्ष करत देशाच्या सर्वोच्च पदावर बसून पंतप्रधान बनल्यावर घोटाळेबाजांना शिक्षा करतो तर एक पंतप्रधान मात्र मुख्य आर्थिक सल्लागार, पंतप्रधान, गव्हर्नर अशा पदांवर बसूनही आपल्या कार्यकाळात किती घोटाळेबाजांना शिक्षा देतो ? याचे उत्तर न उकलणारे आहे. परंतु मनमोहनसिंग यांचे योगदान मोठे आहे आज एका अर्थानं त्यांच्या निवृत्तीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेत त्यांची उणीव जाणवेल. मितभाषी मनमोहनसिंग यांनी कमी बोलत कायम तत्पर राहिले मात्र त्यांच्याच पक्षाचे हायकमांड टक्केवारीत मश्गूल राहिले हा न पुसता येणारा इतिहास आहे.
 
आज 'सर' पदवी मिळालेले मनमोहनसिंग ३३ वर्षांनंतर निवृत्ती घेत आहेत.पण यापुढे मनमोहनसिंग यांच्याकडून काय भाष्य होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. काँग्रेसची वाटचाल कुठल्या दिशेने चालली आहे हे खुद्द मनमोहनसिंग यांनाही ठाऊक आहे.आज काँग्रेसचे नेतृत्व मनमोहनसिंग यांनी केलेल्या आर्थिक बदलांवर न बोलता केवळ अदानी अंबानी यांच्यावर टीका करण्यात गुंग आहे. देशाचे या गोष्टींमुळे भले होणार आहे का याचे उत्तर काँग्रेसने देणे अपेक्षित आहे.आपला प्रगतीचा इतिहास घालवलेल्या काँग्रेसला पुन्हा एकदा आर्थिक सुधारणांचा पाढा वाचता येवो हीच ईश्वरचरणी सदिच्छा!