हिंदूंवर हल्ले कराल, तर याद राखा! मंगलप्रभात लोढा कडाडले

03 Apr 2024 20:12:27
 mangalprabhat lodha
 
मुंबई : परळच्या पोस्टगल्ली परिसरातील हिंदू तरुणांवर भ्याड हल्ला करणाऱ्या कट्टरपंथींविरोधात राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा ( Mangal Prabhat Lodha ) बुधवारी चांगलेच आक्रमक झाले. हिंदूंवर हल्ले कराल, तर याद राखा, असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला. त्याचवेळी या प्रकरणाची तक्रार दाखल करून घेण्यास कुचराई करणाऱ्या भोईवाडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले.
 
दि. २८ मार्च रोजी शिवजयंतीच्या दिवशी पोस्टगल्ली परिसरातील हिंदू तरुण आणि काही कट्टरपंथींमध्ये क्रिकेट खेळण्यावरून वाद झाला. याचा राग मनात धरून या कट्टरपंथींनी ३१ मार्च रोजी हिंदू तरुणांवर जीवघेणा हल्ला केला. त्यात काही जण जखमी झाले. याविरोधात पीडित तरुणांनी भोईवाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. परंतु, पोलिसांकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. उलट तक्रार करण्यासाठी आलेल्या तरुणांना पोलिसांकडूनच मारहाण करण्यात आली आणि तुमच्यावर चॅप्टर केस दाखल करू, अशी धमकी देण्यात आली.
 
हे वाचलत का - उबाठा गटात दाखल झालेल्या उन्मेष पाटलांना जळगावची उमेदवारी नाहीच
 
या घटनेची माहिती मिळताच मंत्री मंगलप्रभात लोढा तत्काळ भोईवाडा पोलीस ठाण्यात दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांना फैलावर घेतले. हिंदू युवकांना मारहाण करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल न करता, तक्रारदारांना मारहाण करण्याचा प्रकार अतिशय निंदनिय आहे. तुम्हाला दक्षिण मुंबईची मालवणी होऊ द्यायची आहे का? असा सवाल विचारला. संबंधित अधिकाऱ्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी लावून धरली. तसेच या दोषींवर कठोर कारवाई होत नाही, तोवर शांत राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. मंगलप्रभात लोढा यांचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनी तत्काळ तक्रार दाखल करून घेतली आणि संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली.
 
रोहिंग्या आणि बांग्लादेशींवर कारवाई करण्यास सरकार सक्षम 
 
परळच्या पोस्ट गल्ली परिसरात गेल्या आठ महिन्यांपासून कट्टरपंथीयांकडून हिंदूंना जाणिवपूर्वक त्रास दिला जात आहे. तीन-चार मोठ्या घटना घडल्यानंतरही पोलिसांनी कारवाई केलेली नाही. उलट तक्रार दाखल करायला येणाऱ्यांवर कारवाई करण्याची धमकी देण्यात आली. तसेच पोलिस ठाण्यात मारहाण करण्यात आली. पोलीस ठाण्यात तक्रारदाराला मारहाण करण्याचा प्रकार याआधी कधीच घडलेला नाही. काही राजकीय व्यक्तींनी याची तक्रार नोंद करून न घेण्यासाठी दबाव आणला. स्थानिकांनी माझ्याकडे याविषयी तक्रार केल्यानंतर मी तातडीने भोईवाडा पोलीस ठाण्यात पोहोचलो.
 
हे वाचलत का - ठाकरेंनी भरला काँग्रेसला दम! म्हणाले, "सांगलीची जागा..."
 
मालवणीत अशाप्रकारे एका विशिष्ट धर्माचे लोक एकत्र येऊन त्रास देतात. येथेही तसाच प्रकार सुरू आहे का? याचा तपास करण्याची सूचना पोलिसांना केली. आम्ही दक्षिण मुंबईची मालवणी होऊ देणार नाही, दादागिरी खपवून घेणार नाही. पोलीस याविषयी तक्रार नोंद करून घेत नाहीत, ही अतिशय दुर्दैवी बाब आहे.
 
भोईवाडा पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने संबंधित तक्रारदारांना फोन केला आणि आधारकार्ड घेऊन येण्यास सांगितले. तुमच्यावर चॅफ्टर केस दाखल करायची आहे, अशी धमकी दिली. ज्यांना मारहाण झाली त्यांच्यावरच अशाप्रकारे गुन्हे दाखल केले जात असतील, तर पोलीस ठाण्यात न्याय मागायला कोणी येणार नाही. दक्षिण मुंबईतही रोहिंग्या आणि बांग्लादेशी मुस्लिमांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यांच्यावर योग्यवेळी कारवाई न केल्यास केल्यास भविष्यात भयंकर स्थिती ओढवू शकते. अशा प्रवृत्तींवर कारवाई करण्यास आमचे सरकार सक्षम आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली.
 
हे वाचलत का - काँग्रेसला मोठा धक्का!, ऑलिम्पिक विजेता खेळाडू भाजपात दाखल!
 
मालवणीमध्ये घडत असलेले प्रकार संपूर्ण मुंबईमध्ये करण्याचा काही समाजकंटक प्रयत्न करीत आहेत. भोईवाड्यामध्ये झालेला हा प्रकार त्याचाच एक भाग आहे. आम्ही दक्षिण मुंबईला मालवणी होऊ देणार नाही. आज सगळा समाज येथे एकत्र आलेला आहे, त्याची दखल पोलीसांनी घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेज बघून, घटनेची संपूर्ण माहिती घेऊन पोलीस योग्य ती कारवाई करतील. असं कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. 

Powered By Sangraha 9.0