मुंबई : मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांग्लादेशिंचा बंदोबस्त करावा लागेल. अन्यथा हिंदू तरुणी, महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाही, असा इशारा मंत्री मंगलप्रभात लोढांनी दिला आहे. मुंबईतील मानखुर्द परिसरात लव्ह जिहादची घटना घडली आहे. याठिकाणी एका सुटकेसमध्ये हिंदू तरुणीचा मृतदेह सापडला आहे.
मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबाची भेट घेत त्यांना सांत्वना दिली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "मुंबईतील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. मुंबईत अनधिकृतपणे राहणाऱ्या रोहिंग्या, बांग्लादेशिंचा बंदोबस्त करावा लागेल. अन्यथा हिंदू तरुणी, महिला सुरक्षितपणे घराबाहेर पडू शकणार नाही." तसेच २४ तासांच्या आत आरोपीवर कठोर कारवाई झाली नाही, तर उग्र आंदोलनाचा इशाराही मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिला.
हे वाचलंत का? - "औरंगजेब किंवा याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणं कधीही चांगलं!"
मानखुर्द येथील साठेनगर परिसरात राहणाऱ्या पूनम क्षीरसागर नामक हिंदू तरुणीचा एका सुटकेसमध्ये मृतदेह सापडला. १८ एप्रिल रोजी निजाम नामक टॅक्सी ड्रायव्हर तिला पळवून कल्याणमध्ये घेऊन गेला आणि तिची हत्या केली. त्यानंतर तो तिचा मृतदेह घेऊन कल्याणमधील हॉस्पीटलमध्ये गेला. ज्यावेळी त्याला तिचा मृत्यू झाला आहे असं कळलं, त्यावेळी तो तिचा मृतदेह घेऊन पळून गेला. त्या मृतदेहाचे तुकडे करुन ते सुटकेसमध्ये भरले आणि ती सुटकेस सोडून दिली. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्या मुलाला तिथे फिरताना बघितले आणि ते त्याला घेऊन पोलिस स्टेशनला गेले. त्याठिकाणी त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "ही एक भयानक घटना असून याआधी चेंबूर आणि अंधेरीमध्येदेखील अशा घटना घडल्या होत्या. यामध्ये दलित आणि मातंग समाजाला टार्गेट करण्यात येत आहे. चेंबूर, मानखुर्दमध्ये सरकारी जमिनीवर कब्जा करुन अनधिकृत बांधकाम करण्याचे रोहिंगे आणि बांग्लादेशींचे षडयंत्र सुरु आहे. पोलिस आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर लगेच सरकारी जमिनी रिकाम्या करण्याची कारवाई सुरु होणार आहे. तसेच रोहिंगे आणि बांग्लादेशींची शोधमोहिमही सुरु होणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.