टोरंटो : कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात खलिस्तान समर्थकांनी घोषणाबाजी केली. या वेळी ट्रुडो या भारतविरोधी घोषणांवर हसत राहिले आणि त्यांना रोखण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही. ट्रुडोच्या या कृत्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून कॅनडा सरकारची भारतविरोधी वृत्ती पुन्हा एकदा समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कॅनडातील टोरंटो या मोठ्या शहरात आयोजित खालसा डे सेलिब्रेशनमध्ये हा प्रकार घडला. या कार्यक्रमाचे आयोजन शीख संघटनांनी केले होते. कॅनडाचे अनेक खासदार, टोरंटोचे महापौर, कॅनडाचे विरोधी पक्षनेते पियरे पोलिव्हर आणि पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी यात सहभाग घेतला.
शीख नववर्ष साजरे करण्यासाठी शीख संघटनांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. पंतप्रधान ट्रूडो यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केले आणि कॅनडाच्या उभारणीत शीख समुदायाचे महत्त्व असल्याचे सांगितले आणि त्यांचे अभिनंदन केले. मात्र, या कार्यक्रमातही भारतविरोधी नारे लावण्यात आले.
पंतप्रधान ट्रुडो यांच्या भाषणादरम्यान मोठ्या संख्येने लोक खलिस्तानी झेंडे घेऊन कार्यक्रमाला पोहोचले आणि खलिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत राहिले. यावेळी ट्रुडो या घोषणा देणाऱ्यांकडे असहायपणे पाहत राहिले. या घटनेनंतर दोन्ही देशांमधील आधीच तणावपूर्ण संबंध आणखी चिघळण्याची शक्यता आहे. शीख मतपेढीसाठी कॅनडात खलिस्तानी आणि भारतविरोधी घटकांना पाठिंबा देत असल्याचा आरोप जस्टिन ट्रूडो यांच्यावर करण्यात आला आहे. भारताने सातत्याने अशा घटकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे, ज्याकडे कॅनडा सरकारने कानाडोळा केला आहे.
कॅनडा सरकारच्या नाकाखाली अनेक खलिस्तानी कॅनडातून भारतविरोधी मोहिमा चालवत आहेत, अगदी जस्टिन ट्रुडो यांच्या सरकारचा भाग असलेले खासदार जगमीत सिंगही भारतविरोधी भूमिका घेत आहेत. या कार्यक्रमात त्यांनी जनतेला संबोधितही केले. उल्लेखनीय आहे की कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी २०२३ मध्ये भारतावर आरोप केला होता की त्यांच्या गुप्तचर एजंट्सनी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केली होती. कॅनडाच्या संसदेत त्यांनी हा आरोप केला होता. मात्र, या आरोपाबाबत त्यांनी कोणताही पुरावा सादर केला नाही. भारताने या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.