‘आयएस-केपी’चे वैश्विक संकट

    27-Apr-2024
Total Views |
IS-KP

सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेला भारतीय समाज हा ‘आयस-केपी’च्या रडारवर आहे. शिवाय, ‘इसिस-केपी’च्या इतर अतिरेकी गटांसोबतच्या युतीमुळे भारतीय हितसंबंधांवर हल्ले सुरू करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्याचबरोबर ‘आयएस-केपी’ प्रचार आणि भरतीसाठी करत असलेला सोशल मीडियाचा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे भारताला सायबर धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, ‘आयस-केपी’द्वारे हिंदू समाजाविरुद्ध मुद्दाम पसरवण्यात येणारी चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांचा प्रसार सामाजिक विभाजन वाढवून आणि भारताच्या लोकशाही संस्थांसाठी समस्या निर्माण करू शकतो.

‘इस्लामिक स्टेट ऑफ इराक अ‍ॅण्ड सीरिया - खोरासान प्रांत’ (आयएस-केपी) ही ‘इस्लामिक स्टेट’ या अतिरेकी गटाची एक शाखा आहे, जी सध्या प्रामुख्याने मध्य आणि दक्षिण आशियाई देशांमध्ये दहशत निर्माण करताना दिसते. खोरासान प्रांत हा पर्शियन साम्राज्याचा महत्त्वाचा भाग होता, जो आधुनिक काळात अनेक देशांमध्ये विभागला असून अफगाणिस्तान, पाकिस्तान, इराण आणि मध्य आशियाई देशांचे काही भाग यात समाविष्ट आहेत. सुन्नी पंथीयांचे वर्चस्व असलेला हा भाग भौगोलिक-राजकीय सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. सीरियन गृहयुद्ध सुरु असताना, २०१३ मध्ये ‘आयसिस’ किंवा ‘इसिस’ची स्थापना झाली. २०१४ पर्यंत ‘इसिस’ने जवळपास सगळाच पूर्व सीरिया काबीज केला. हे पाहून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील विविध अतिरेकी संघटनांच्या असंतुष्ट सदस्यांनी ‘इसिस’चा म्होरक्या अबू बकर अल-बगदादीशी निष्ठा ठेवण्याचे वचन दिले आणि ‘आयएस-केपी’ या गटाचा उगम झाला. ‘आयएस-केपी’च्या निर्मितीला अनेक राजकीय घटक कारणीभूत ठरले. इराक आणि सीरियामध्ये झालेल्या ‘इसिस’च्या उदयाचा जगभरातील जिहादी गटांवर मोठा प्रभाव पडला. ‘इसिस’च्या कट्टरपंथीय इस्लामिक विचारसरणीने इतर प्रदेशातील अतिरेक्यांना प्रेरित केले आणि त्यांच्या कार्यात सामील करून घेतले.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील अतिरेकी संघटनांमधील अंतर्गत विभाजन आणि नेतृत्व विवादांमुळे ‘इसिस-केपी’ला वेगळा जिहादी पर्याय शोधणार्‍या असंतुष्ट सैनिकांची भरती करण्याची संधी निर्माण झाली. अफगाणिस्तान-पाकिस्तान प्रदेशात पाय रोवण्याच्या आणि मध्य पूर्वेच्या पलीकडे त्याचा प्रभाव वाढवण्याच्या मोहिमेची सुरूवात म्हणून, जानेवारी २०१५ मध्ये या गटाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा करण्यात आली. ‘आयएस-केपी’चे उद्दिष्ट अफगाणिस्तान, पाकिस्तान तसेच मध्य आशियातील वांशिक आणि सांप्रदायिक तणावाचे भांडवल करून, येथील सरकारांना आव्हान देऊन इस्लामिक राजवट निर्माण करणे हे होते. स्थापनेपासूनच ‘आयएस-केपी’ची विचारधारा, खोरासान प्रदेशात तथाकथित इस्लामिक खिलाफत स्थापन करण्याच्या महत्त्वाकांक्षेने प्रेरित आहे. या गटाने नागरिक, सुरक्षा दल आणि धार्मिक अल्पसंख्याकांवर केलेल्या क्रूर हल्ल्यांमुळे, आत्मघाती बॉम्बस्फोट, हत्या आणि अपहरण यांसारखे डावपेच वापरून आपली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्वरीत प्रसिद्धी मिळवली. ‘आयएस-केपी’च्या उदयामुळे आधीच अनेक दशकांपासून संघर्ष, दहशतवाद आणि अस्थिरतेने त्रस्त असलेल्या अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधील सुरक्षा परिस्थिती आणखी गुंतागुंतीची झाली आहे. या गटाच्या कृतींमुळे नागरी घातपात, विस्थापन आणि स्थानिक लोकांमध्ये व्यापक भीती निर्माण झाली आहे, ज्यामुळे या प्रदेशात मानवतावादी संकटे वाढली आहेत.

‘आयएस-केपी’ सध्या चर्चेत का आहे?
दि. २२ मार्च रोजी संध्याकाळी झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्याने रशिया हादरला. चार बंदूकधार्‍यांनी एका कॉन्सर्ट दरम्यान मॉस्को येथील क्रॉकस सिटी हॉल मध्ये हल्ला केला, ज्यात १४४ रशियन नागरिक मृत पावले. या हल्ल्याची वेळ अत्यंत महत्त्वाची होती. कारण, पुतीन यांची रशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पाचव्यांदा निवड झाल्याच्या चार दिवसांतच हा हल्ला झाला. या आधी २०२१ मध्ये काबूल विमानतळाबाहेर घडलेल्या हल्ल्याची जबाबदारी ‘आयएस-केपी’ने स्वीकारली होती. त्यात १७५ नागरिक आणि १३ अमेरिकन सैनिक ठार झाले होते. मे २०२० मध्ये काबूलमधील एका प्रसूती वॉर्डवर मोठा हल्ला झाला होता, त्यात महिला आणि नवजात बालकांसह २४ लोक मारले गेले होते. यावरूनच ‘इसिस-केपी’च्या क्रूरतेची आपल्याला जाणीव होते. त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये, या गटाने काबूल विद्यापीठावर हल्ला केला होता, ज्यात किमान २२ शिक्षक आणि विद्यार्थी ठार झाले. या वर्षाच्या सुरवातीला इराणच्या आग्नेय भागात असलेल्या केर्मन शहरात जवळपास १०० लोक मारले गेले होते. ‘आयएस-केपी’ने केर्मन हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. मध्य आशिया ते अगदी भारतातील काश्मीर खोर्‍यापर्यंत अशांतता निर्माण करणे आणि यादवी माजवणे हे ‘आयएस-केपी’चे उद्दिष्ट आहे.

‘इसिस’ आणि पुतीन यांचे वैर सर्वश्रुत आहे. सीरियन गृहयुद्धात रशियाने सीरियन सरकारला ‘इसिस’ विरोधात मोठी मदत पुरवली होती. तेव्हापासून रशिया या ‘इसिस’च्या यादीत वरच्या स्थानावर आहे. रशियातील अस्थिर भाग म्हणून ओळखला जाणारा कॉकेशस पर्वतांमधील चेचन्या, तसेच रशियन सीमेवर असलेल्या पूर्व युरोप, त्याचबरोबर मध्य आशियाई देशांतील अनेक युरेशियन मुस्लीम ‘इसिस’च्या प्रपोगंडाला बळी पडत असल्याने रशिया पूर्ण बळानिशी ‘इसिस’ विरोधात लढण्याचा विडा उचलला. मागच्या महिन्यात झालेल्या हल्ल्यात देखील हल्लेखोरांमध्ये मध्य आशियातील ताजिकिस्तान देशातील मुस्लिमांचा समावेश आहे.
 
अफगाणिस्तानातील राजकारण आणि वाढता दहशतवाद

ताजिकिस्तान हा मध्य आशियातील अतिशय गरीब देश. अफगाणिस्तानात ‘ताजिक’ हा दुसर्‍या क्रमांकाचा सर्वात मोठा वांशिक गट आहे, तर ‘पश्तून’ हा सर्वात मोठा वांशिक गट. तर तालिबान ही सध्या अफगाणिस्तानात सत्तेवर असलेली इस्लामिक संघटना या पश्तूनांच्या वर्चस्वाखाली कार्यरत आहे. ‘इसिस’ ही दहशतवादी संघटना अफगाणिस्तानातील ताजिक लोकांसारख्या अल्पसंख्याकांना सोबत घेऊन आपले वर्चस्व निर्माण करण्याच्या प्रयत्नांत आहे. एकेकाळी ताजिक गट हा तालिबान विरुद्ध लढण्यात पुढे होता. अनेक ताजिक हुतात्म्यांचा वापर करून सध्या ‘इसिस’ या ताजिक लोकांना तालिबानविरुद्ध लढण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. ‘इसिस’कडून मुद्दाम मध्य आशियातील सामाजिक-आर्थिक असमानता, राजकीय स्वातंत्र्याचा अभाव आणि जातीय तणावाला कंटाळलेल्या उपेक्षित लोकसंख्येला लक्ष्य केले जाते. याचबरोबर ‘अल कायदा’, ‘तेहरिक-ए-तालिबान’, ‘अफगाण तालिबान’मधील नाराज म्होरक्यांचा आणि पाकिस्तानातील ‘आयएसआय’सारख्या संस्था ‘इसिस’कडे भूराजकीय संधीच्या दृष्टीने पाहत असल्याने अनेक सुरक्षेशी संबंधित समस्या निर्माण होत आहेत.
 
‘आयएस-केपी’ आणि भारत
 
भारत-पाकिस्तान सीमेजवळील परिसरात, तसेच पाकिस्तानच्या मागासलेल्या खेड्यांमध्ये ‘आयएस-केपी’ने घुसखोरी करण्यास सुरवात केली आहे. ‘इसिस’साठी अवैध शस्त्रास्त्रे, अमलीपदार्थ पुरवणे तसेच दहशतवादी कारवायांमध्ये अग्रेसर असणारे कट्टरपंथीय ‘स्लीपर सेल’ भारतातही मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. भारतीय सुरक्षा यंत्रणांनी देखील मागच्या वर्षात ‘इसिस’शी जोडल्या गेलेल्या मोठ्या रॉकेट्सचा पर्दाफाश केला आहे. मागच्या वर्षी भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून ‘इसिस’शी संबंधित ६५ दहशतवाद्यांना पकडण्यात आले. देशभरातून पकडण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी महाराष्ट्र आणि त्यापाठोपाठ केरळ येथून पकडण्यात आलेल्यांची संख्या जास्त आहे. ‘आयएस-केपी’ची अत्याधुनिक प्रचार यंत्रणा आणि ऑनलाईन भरती धोरणे भारतीय नागरिकांना कट्टरतावादी बनवण्यात प्रभावी ठरत आहेत. या गटाची अतिरेकी विचारधारा भारतातील कट्टरपंथीय इस्लामिक समाजातील तरुणांना भडकावून आपल्या गटात सामील करून घेण्यासाठी निष्पाप नागरिकांवर प्राणघातक हल्ले, बॉम्बस्फोट इत्यादी देशविघातक गोष्टी घडवून आणण्यासाठी प्रवृत्त करत आहे.


 ‘इसिस-केपी’च्या अजेंडामध्ये धार्मिक अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे समाविष्ट आहे. या गटाची अतिरेकी विचारधारा हिंदूंसोबतच शिया मुस्लीम, ख्रिश्चन आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांकांविरुद्ध सांप्रदायिक हिंसाचाराला प्रोत्साहन देते. सांस्कृतिकदृष्ट्या वैविध्यपूर्ण असलेला भारतीय समाज हा ‘आयएस-केपी’च्या रडारवर आहे. शिवाय, ‘आयएस-केपी’च्या इतर अतिरेकी गटांसोबतच्या युतीमुळे भारतीय हितसंबंधांवर हल्ले सुरू करण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्याचबरोबर ‘आयएस-केपी’ प्रचार आणि भरतीसाठी करत असलेला सोशल मीडियाचा आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या वापरामुळे भारताला सायबर धोका निर्माण झाला आहे. याव्यतिरिक्त, ‘आयएस-केपी’द्वारे हिंदू समाजाविरुद्ध मुद्दाम पसरवण्यात येणारी चुकीची माहिती आणि खोट्या बातम्यांचा प्रसार सामाजिक विभाजन वाढवून आणि भारताच्या लोकशाही संस्थांसाठी समस्या निर्माण करू शकतो.

भारताचे जागतिक पातळीवरील धोरणात्मक महत्त्व, लक्षणीय आर्थिक वाढ, सर्वधर्म समभावाच्या तत्वावर आधारलेली लोकशाही, आणि मोठ्या प्रमाणात असलेली मुस्लीम लोकसंख्या हे सगळेच घटक ‘आयएस-केपी’च्या रडारवर भारताला मुख्य देश बनवतात. भारतावर हल्ला करून इस्लामिक खिलाफत स्थापन करणे हे ‘इसिस’च्या जागतिक जिहादी अजेंड्यामधील महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. ‘आयएस-केपी’चा भारताला असलेला धोका निव्वळ रणनीती नसून वैचारिक देखील आहे, जी भारताच्या लोकशाही मूल्यांसमोरील मोठी समस्या आहे.‘इसिस’चा भारताला असलेला धोका बहुआयामी आहे, ज्यात दहशतवाद, कट्टरतावाद, सांप्रदायिक हिंसाचार, सायबर हल्ला यांसारखे धोके समाविष्ट आहेत. या गटाचे प्राथमिक लक्ष अफगाणिस्तान-पाकिस्तानात पाय रोवणे असले तरीही, त्याचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क, अतिरेकी विचारसरणी आणि जागतिक जिहादी अजेंडा यामुळे भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मात्र आहे. एका बाजूला धोरणात्मक कूटनीती, तर दुसर्‍या बाजूला मजबूत अंतर्गत सुरक्षा धोरण या मोदी सरकारच्या फॉर्मुल्यामुळे भारतमातेविरुद्ध उभ्या असलेल्या असुरांना तोंड देण्यासाठी आजचा भारत नक्कीच सक्षम आहे.


शांभवी थिटे
(लेखिका जेएनयू, दिल्ली येथून आंतरराष्ट्रीय संबंधात पीचडी करत आहेत.)