सपाच्या काळात पोलिस स्टेशनच्या जागेवर बांधला मकबरा; योगी सरकारने लेखपाल मोहम्मद सईदवर केली कारवाई

    23-Apr-2024
Total Views |
 Mazar
 
 
लखनौ : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनच्या जमिनीवर बांधलेल्या थडग्याच्या प्रकरणात उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने मोठी कारवाई केली आहे. अकरा वर्षांपूर्वी पोलीस ठाण्याच्या जागेवर मकबरा बांधण्यात मोठा हातभार लावणाऱ्या तत्कालीन लेखापाल मोहम्मद सईद याला बलरामपूर पोलिसांनी अटक केली आहे. निवृत्त मोहम्मद सईद यांच्यावर समाजवादी पक्षाच्या सरकारच्या काळात कागदपत्रांमध्ये फसवणूक आणि बनावट कागदपत्रे बनवल्याचा आरोप आहे.
 
निवृत्त लेखापालाला रविवार, दि. २१ एप्रिल २०२४ अटक करण्यात आली. बलरामपूर पोलिसांनी मोहम्मद सईदच्या अटकेला दुजोरा दिला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१३ साली सादुल्लानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जमीन बळजबरीने बळकावून कबर बांधल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू होता. या तपासात तत्कालीन लेखापाल मोहम्मद सईदचेही नाव पुढे आले होते.
 
 
मोहम्मद सईदने आपल्या पदाचा गैरवापर करून बनावट कागदपत्रे तयार करून घेतली होती. फसवणूक केल्याप्रकरणी सईदला न्यायालयात हजर करून तुरुंगात पाठवण्यात आले आहे. बलरामपूर पोलिसांनी सईदच्या आधी मारूफ अन्वर हाश्मीला अटक केली होती. दि. १ एप्रिल २०२४ रोजी एफआयआर दाखल होताच मारूफला अटक करण्यात आली. पोलीस ठाण्याच्या जागेवर कब्जा करून बांधलेल्या थडग्याचा मारूफ हा मुतवाली होता. ते समाजवादी पक्षाचे माजी आमदार आणि अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय आरिफ अन्वर हाश्मी यांचे भाऊ आहेत.
 
२०१३ मध्ये समाजवादी पक्षाचे माजी आमदार आरिफ अन्वर हाश्मी यांनी पोलीस ठाण्याच्या जागेला कर्मचाऱ्यांना धमकावून ताब्यात घेतले होते. येथे एक कायमस्वरूपी कबर बांधण्यात आली आणि तिला ‘मझार शरीफ शहीद-ए-मिल्लत अब्दुल कुद्दुस शाह रहमतुल्ला अलैह’ असे नाव देण्यात आले. पोलीस ठाण्याच्या या जमिनीवर सैनिकांना राहण्यासाठी बॅरेक बांधण्याचा प्रस्ताव होता. इतर कारणांमुळे हे प्रकरण प्रदीर्घ काळ न्यायालयात प्रलंबित राहिले.
 
बलरामपूरचे विद्यमान पोलीस अधीक्षक आयपीएस केशव कुमार यांनी ही बाब गांभीर्याने घेतली आणि त्यांच्या अधिनस्त अधिकाऱ्यांना आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. अखेर, या सर्व आरोपींवर आयपीसी कलम ४२०, ४६८, १२०बी, १८६, ४३४, ४६७ आणि ४७१ तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.