"उद्धव ठाकरेंना पंतप्रधान बनवण्यासाठी शरद पवार पाठिंबा देतील" - राऊतांनी व्यक्त केला विश्वास

    20-Apr-2024
Total Views |
 pawar
 
मुंबई : संजय राऊत सध्या आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आहेत. त्यात त्यांनी आता उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होतील, असा दावा केला आहे. ते सांगलीतील पत्रकार परिषदेत बोलत होते. सांगलीमध्ये उबाठा गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर संजय राऊत यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर दिली.
 
यामध्ये पत्रकारांनी संजय राऊतांना विचारले की, समाज माध्यमांवर इंडी आघाडीचं सरकार आल्यास, उद्धव ठाकरे पंतप्रधान, आदित्य ठाकरे गृहमंत्री, संरक्षणमंत्री संजय राऊत आणि अर्थमंत्री सुप्रिया सुळे होतील, अशा आशयाच्या पोस्ट व्हायरल होत आहेत, त्यावर तुमचं मत काय? या प्रश्नाला उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, यात काहीही वाईट नाही. नक्कीच उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात. इंडी आघाडीतील सगळेच नेते त्यांना पाठिंबा देतील."
 
 
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंनी उत्तम काम केलं होतं. त्यांनी कोरोना काळात एक राज्य सांभाळलेले आहे. आज देशाला उद्धव ठाकरे यांच्यासारख्या सर्वसमावेश नेतृत्वाची गरज आहे. त्यात काहीही चुकीचं नाही" याचं प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना पंतप्रधान बनवण्यासाठी शरद पवार पाठिंबा देतील, असाही दावा केला.
 
संजय राऊत म्हणाले की, "आम्ही आतापर्यंत शरद पवार पंतप्रधान होतील, देशाचं नेतृत्व करतील म्हणून वाट पाहत होतो. पण राजकारणामुळे ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत. पण आता उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार असतील तर शरद पवार नक्कीच त्यांना पाठिंबा देतील. याचं पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी इंडी आघाडी देशात ३०० हून अधिक जागा जिंकेल असा दावा केला.
 
राऊत म्हणाले की, "इंडी आघाडी देशात ३०० हून अधिक जागा जिंकेल. तर महाराष्ट्रात आमचं लक्ष्य ३५ हून अधिक जागा जिंकण्याचं आहे. भाजपला या लोकसभा निवडणुकीत २०० पेक्षा कमी जागा मिळतील. भाजपच्या जागा या १८० ते २०० दरम्यान असतील, असा दावाही संजय राऊत यांनी केला.