पंतप्रधानांचा उत्तराखंडमध्ये काँग्रेसवर हल्लाबोल; 'देशात आग लावणाऱ्यांना...'

    02-Apr-2024
Total Views |
Narendra Modi On Congress

नवी दिल्ली :  काँग्रेस पक्ष देशाच्या दहा वर्षे सत्तेपासून दूर राहिला असून आता ते देशाला तोडण्याची आणि आग लावण्याची भाषा बोलत आहे. अशा प्रवृत्तीस देशातील मतदारांनी शिक्षा द्यावी, असे आवाहन उत्तराखंडमधील प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले आहे.लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे विजय शंखनाद सभेस संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी इंडी आघाडीवर जोरदार हल्ला केला.

काँग्रेस पक्ष गेली दहा वर्षे सत्तेपासून दूर असून आता ते देश पेटवण्याची भाषा करत आहेत. काँग्रेसचा कर्नाटकातील एक नेता देश तोडण्याचा दावा करतो आणि काँग्रेस पक्षाने त्यालाच उमेदवारी दिली आहे. अशा मानसिकतेचा पराभव करण्याती गरज आहे. काँग्रेसने दीर्घकाळ देशाला लुटले असून त्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही. त्यांना केवळ देश अस्थिर करायचा आहे. काँग्रेस पक्ष आज लांगुलचालन आणि अराजकतेच्या दलदलीत अडकली आहे. काँग्रेसने देशात घुसखोरांना प्रोत्साहन दिले. एवढेच नव्हे तर भारताचे एक बेटही श्रीलंकेला दिले आहे. त्यामुळे देशात आग लावणाऱ्यांना मतदारांनीच शिक्षा द्यावी, असे अवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

आपल्या तिसऱ्या कार्यकाळात भ्रष्टाचाराविरोधात आणखी कठोर प्रहार होईल, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली. ते पुढे म्हणाले, देशास भ्रष्टाचारमुक्त करून जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनविण्याचे स्वप्न जनतेच्या आशीर्वादाने साध्य होणार आहे. उत्तराखंडचादेखील चौफेर विकास साधला जाणार आहे. गेल्या ५० - ६० वर्षांच्या तुलनेत गेल्या दहा वर्षांत उत्तराखंडमध्ये अधिक विकास झाला आहे. इरादे योग्य असतील तर विकास होतो, हे भाजपने सिद्ध करून दाखवले आहे. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी केवळ दिल्ली दरबारात हजेरी लावण्यावरच भर दिला होता. भाजपने मात्र पायाभूत सुविधा, रस्ते आणि दळणवळणाच्या सुविधांसाठी व्यापक प्रयत्न केले, असेही पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले.

यंदा कर्नाटकातील सर्वच जागा भाजपच्या – गृहमंत्री अमित शाह

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी बंगळुरू येथे भाजपच्या शक्तीकेंद्र प्रमुखांच्या संमेलनास संबोधित केले. यावेळी ते म्हणाले, एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थ नेतृत्व तर दुसरीकडे भ्रष्ट कौटुंबिक पक्ष असा सामना आहे. भाजपला २०१४ साली कर्नाटकातील मतदारांनी ४३ टक्के मतांसह १७ जागांवर विजयी केले होते, तर २०१९ साली ५१ टक्के मते देऊन २५ जागांवर विजय मिळवून दिला होता. यावेळी मात्र कर्नाकातील जनतेने सर्वच्या सर्व २८ जागांसाठी विजयाचा आशीर्वाद द्यावा, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.