पुणे : बारामती लोकसभेच्या महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी आज माझ्यासाठी मोठा दिवस आहे, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. दरम्यान, त्यांच्या प्रचारार्थ सभाही आयोजित करण्यात आली होती.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, "आज माझ्यासाठी मोठा दिवस आहे. म्हणूनच आम्ही आज गणपती बाप्पांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो आहोत. जनसामान्यांची सेवा करण्याची संधी दे आणि लोकसभेत मोठा विजय मिळू दे अशी प्रार्थना मी देवाकडे केली आहे. बारामती मतदारसंघात लोकांमध्ये प्रचंड उत्साह असून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे," असे त्या म्हणाल्या.
हे वाचलंत का? - सुनेत्रा पवारांनी अर्ज भरला! सुप्रिया सुळे म्हणतात, "माझ्यासाठी विचारांची लढाई"
त्यानंतर महायूतीच्या सभेमध्ये बोलताना सुनेत्रा पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतूकही केले. त्या म्हणाल्या की, "आपण सर्वजण देशाच्या विकासाच्या प्रेरणेने एकत्र आलेलो आहोत. मागील १० वर्षांत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारताने प्रचंड विकास केला असून संपूर्ण जगाने याची नोंद घेतली आहे. गेली १० वर्ष न थकता देशासाठी जीव झोकून काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींना जनता पाहत आहेत. त्यांच्याविषयी जनतेच्या मनात विश्वास आहे," असेही त्या म्हणाल्या.