पुणे : माझी ही वैयक्तिक लढाई नसून विचारांची लढाई आहे, असं वक्तव्य शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी केलं आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे आणि महायूतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी बारामती लोकसभेसाठी गुरुवारी अर्ज दाखल केला. त्याआधी सुळेंनी माध्यमांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "माझी कुणाशीही वैयक्तिक लढाई नाही. माझी लढाई ही वैचारिक आहे. त्यामुळे समोर कोण लढतंय याचा फारसा विचार मी करत नाही. मी कधीच कुणावर वैयक्तिक टीका केलेली नाही. आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवतो. त्यामुळे जो कुणी काश्मीर ते कन्याकुमारी निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येकाला मनापासून शुभेच्छा आहे."
"चंद्रकांतदादा पाटील सातत्याने एकच गोष्ट म्हणतात की, आम्हाला शरद पवारांना संपवायचं आहे. त्यामुळे ही लढाई फक्त एका विचाराची असून गेली सहा दशकं जे नाव देशाच्या राजकारणात राहिलं आहे ते शरद पवार आणि महाराष्ट्राच्या विरोधात हे षडयंत्र आहे. गेली दहा दशकं पवार साहेबांवर टीका केली की, ती हेडलाईन होते. याचा अर्थ सहा दशकं तेच गाणं टिकत आहे," असे त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, "माझी कुणाशीच कधीच नाती बिघडत नाही. त्यामुळे निवडणूकीचा आणि वैयक्तिक नात्यांचा कधीच काहीही संबंध नसतो. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे या अजितदादांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, "पवारांच्या घरातली कुठली सासू लढली आहे? माझ्या माहितीप्रमाणे आमच्या घरातील कुठलीही सासू राजकारणात आली नाही. त्या खूप वैयक्तिक आयुष्य जगल्या आहेत," असेही त्या म्हणाल्या.