रत्नागिरी : नुकतीच रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायूतीकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर दुसरीकडे, उबाठा गटाचे नेते विनायक राऊत हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. दरम्यान, याळेळी रत्नागिरीत नारायण राणे विरुद्ध उबाठा अशी थेट लढत पाहायला मिळणार आहे.
२०१४ ला कुडाळ विधानसभा निवडणूकीत उबाठा गटाचे आमदार वैभव नाईक यांनी नारायण राणेंचा पराभव केला होता. तसेच यापूर्वी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत यांनी नारायण राणेंचे पुत्र निलेश राणे यांचा पराभव केला होता. याशिवाय नारायणे राणे आणि विनायक राऊत यांच्यात वैर असल्याचंही बोललं जातं. त्यामुळे यावेळी राणेंना पराभवाचा वचपा काढण्याची चांगली संधी आहे.
दरम्यान, शिवसेनेत पडलेले दोन गट, मोदींची गॅरंटी आणि नारायण राणेंचे केंद्रातील मंत्रीपद या सगळ्यांमुळे यंदा ही लढाई राणेंच्या पथ्यावर पडणार आहे. तसेच नितेश राणे आणि निलेश राणेंच्या नेतृत्त्वात ग्रामपंचायतीतील विजय या सगळ्यांचा एकत्रित परिणाम नारायण राणेंना विजयश्री खेचून आणण्यात मदत करेल, अशी शक्यता जास्त आहे. राणेंसारखा आक्रमक नेता भाजपकडे असल्याने उबाठा गटाची कोकणातील लढाई आता कठीण झाली आहे.