मुंबई : नुकतीच भाजपची आणखी एक यादी जाहीर झाली असून यात रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेचा उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून या जागेसाठी उबाठा गटाचे नेते विनायक राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने गुरुवारी सकाळी लोकसभेच्या उमेदवारांची १३ वी यादी जाहीर केली. या यादीत रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेचा समावेश असून या जागेसाठी नारायण राणेंच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या जागेसाठी नारायण राणे हे महायूतीचे उमेदवार राहणार आहेत. दरम्यान, याठिकाणी नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत असा सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवर शिवसेनेकडून किरण सामंत निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. मात्र, आता उदय सामंत आणि किरण सामंत यांनी निवडणूकीतून माघार घेत नारायण राणेंना पाठींबा देणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच फॉर्म भरताना पूर्ण ताकदीने नारायण राणेंबरोबर उभे राहण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.