मुंबई : एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल तर त्या पक्षाने त्याची हकालपट्टी करायला हवी, असे म्हणत उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. सागंली लोकसभेची जागा उबाठा गटाला गेल्याने विशाल पाटील नाराज असून त्यांनी सोमवारी काँग्रेस पक्षाचा आणि अपक्ष असे दोन उमेदवारी अर्ज भरले आहेत. यावर आता राऊतांनी प्रतिक्रिया दिली.
संजय राऊत म्हणाले की, "काँग्रेस ही अपक्ष आहे का मला माहित नाही. एखाद्या पक्षाचा जर कुणी बंडखोरी करुन महाविकास आघाडीच्या विरुद्ध काम करत असतील तर त्यांच्यावर त्या पक्षाने कारवाई केली पाहिजे. अमरावतीमध्ये दिनेश बुब हे उमेदवार आहेत. पण त्याआधी त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला."
हे वाचलंत का? - राज्यात मविआ तर देशात इंडिया : संजय राऊत
"जर एखाद्या पक्षाचा उमेदवार बंडखोरी करत असेल, महाविकास आघाडीच्या ठरलेल्या निर्णयाविरुद्ध भूमिका घेत असेल आणि महाविकास आघाडीतील पक्षाचे लोक त्याच्याबरोबर उभे राहत असतील, तर संबंधित पक्षाने या सगळ्यांची हकालपट्टी करायला हवी," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "कुणाची ताकद किती आहे आणि किती नाही हे लोकं ठरवतील. त्याच सांगलीमध्ये गेल्या दहा वर्षांपासून भाजपचे आमदार आणि खासदार निवडून येत आहेत. काँग्रेसचा बालेकिल्ला आणि परंपरा असतानासुद्धा मोक्याच्या ठिकाणी भाजपचे लोक निवडून येतात याला मी त्या पक्षाची ताकद मानत नाही. भाजपला टक्कर द्यायची असल्यास सांगलीमध्ये शिवसेनाच उभी राहायला हवी हे आमचं धोरण आहे," असेही ते म्हणाले आहेत.