मुंबई : यावेळी राज्यात महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडी येणार आहे, असे वक्तव्य उबाठा गटाचे नेते संजय राऊतांनी केले आहे. तसेच यावेळी आम्ही देशात ३०५ जागा जिंकणार असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. त्यांनी बुधवारी माध्यमांशी संवाद साधला.
संजय राऊत म्हणाले की, "विदर्भात महाविकास आघाडीचे उमेदवार सर्वत्र आहे. यावेळी कुणाचेही सर्व्हे येऊ द्या पण परिवर्तनाची सुरुवात ही विदर्भातूनच होते, अशी मला खात्री आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे आम्ही पक्ष म्हणून नाही तर महाविकास आघाडी म्हणूनच पाहतो."
"आम्ही महाराष्ट्रात १०० टक्के यश मिळवण्याच्या मार्गावर आहोत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि देशात इंडीया आघाडी येईल. देशात आम्ही साधारण ३०५ जागा जिंकणार आहोत. नरेंद्र मोदी ४०० पार म्हणत आहेत. पण आम्ही ४०० पार म्हणणार नाही. आमचं अनुमान ३०५ जागांचं आहे आणि महाराष्ट्रात आम्ही साधारण ३५ प्लस जागा जिंकू," असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री शिंदेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांचं रामावरचं प्रेम हे नकली आणि राजकीय ढोंगाचं आहे. ते कोणत्याही लढ्यामध्ये आणि संघर्षात नव्हते. राम प्रभू त्यांच्यामागे उभा राहत नाही तर जे मैदानात उभं राहून आत्मविश्वासाने लढतात त्यांच्याच मागे राम उभा राहतो," असेही ते म्हणाले.