महाराष्ट्रातील लांडग्यांच्या अधिवासाच्या विस्तारात अडीच पटीने वाढ; वाढीला समस्यांची किनार

    14-Apr-2024   
Total Views |
wolf
                                                                                                                                        (छाया - डाॅ. ओंकार सुमंत)


मुंबई (अक्षय मांडवकर) : गेल्या १८ वर्षांमध्ये राज्यातील भारतीय लांडग्याच्या अधिवासाच्या परिघाचा विस्तार (होम रेंज) अडीच पटीने वाढला आहे (Maharashtra’s Indian wolf). ‘भारतीय वन्यजीव संस्थान’चे वरिष्ठ प्रकल्प साहाय्यक डॉ. शहीर खान यांनी राज्यातील लांडग्यांवर केलेल्या संशोधनामधून ही माहिती उघडकीस आली आहे (Maharashtra’s Indian wolf). भारतीय लांडग्यासारख्या संकटग्रस्त प्रजातीच्या अधिवासाच्या परिघाच्या विस्तारात झालेली वाढ ही सकारात्मक बाब नसून, त्यामागे गवताळ अधिवासाचा झालेला र्‍हास, भक्ष्याची कमतरता अशी गंभीर स्वरुपाची कारणे आहेत. (Maharashtra’s Indian wolf)

लांडगा हा ’श्वान’ कुळातील प्राणी आहे (Maharashtra’s Indian wolf). भारतात ग्रे लांडग्याच्या ’हिमालयीन लांडगा’ आणि ’भारतीय लांडगा’ या दोन उपप्रजाती आढळतात. महाराष्ट्रात भारतीय लांडगा आढळत असून, राज्यात त्यांचे अधिवास क्षेत्र साधारण ४० हजार, ११४ चौरस किमी क्षेत्रावर पसरलेले आहे. राज्यातील लांडग्यांची संख्या अंदाजे ४०० एवढी गंभीर आहे. मानवी हस्तक्षेपाखाली असलेल्या वन अधिवासात राहणार्‍या वन्यजीवांच्या प्रजाती एक तर नष्ट होतात किंवा आपल्या वर्तनात बदल करून घेतात. लांडगा हा यामधीलच एक प्राणी आहे. लांडग्याच्या बदललेल्या हालचालींच्या पद्धती, प्रजननाचे वर्तन आणि आहार पद्धती यांविषयीचे संशोधन डॉ. शहीर खान यांनी आपल्या ’पीएचडी’अंतर्गत केले. ’डब्ल्यूआयआय’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ (एफ) डॉ. बिलाल हबीब यांच्या मार्गदर्शनअंतर्गत त्यांनी आपले ’पीएचडी’ संशोधन पूर्ण केले.

२००७ साली डॉ. हबीब यांनी सोलापूरमधील गवताळ अधिवासात वावरणार्‍या लांडग्यांवर ’पीएचडी’ संशोधन केले होते. याच संशोधनाला केंद्रस्थानी ठेवून, खान यांनी तुलनात्मक संशोधन केले. या संशोधनामध्ये हबीब आणि खान यांनी मिळून सोलापूर, पुणे आणि अहमदनगरमधील ११ लांडग्यांना ’रेडिओ कॉलर’ लावले. यामाध्यमातून त्यांनी लांडग्यांच्या हालचाली, आहाराच्या पद्धती आणि वर्तनात झालेल्या बदलांची नोंद केली. ’रेडिओ कॉलर’मुळे राज्यातील लांडगा हा प्रतिदिवस १० हजार, ३५७ मीटर हालचाल करत असल्याचे संशोधकांच्या लक्षात आले, तर मादीपेक्षा नर हा १९.१७ टक्के अधिक हालचाल करत असल्याची नोंद त्यांनी केली. पूर्वीच्या संशोधनामध्ये लांडग्यांच्या अधिवासाच्या परिघाचा विस्तार हा १७० चौरस किमी क्षेत्रावर पसरलेला होता. म्हणजे तो आपली हालचाल, खाद्याचा शोध आणि प्रजनन क्रिया या १७० चौरस किमी परिसराच्या परिघात करत असे. मात्र, शहीर यांनी केलेल्या संशोधनाअंती या अधिवासाच्या परिघाचा विस्तार अडीच पटीने वाढला असून, हे क्षेत्र आता ३७८ चौरस किमीपर्यंत विस्तारलेले आहे. लांडगांच्या अधिवासाच्या परिघाचा झालेला हा विस्तार ही सकारात्मक बाब नसल्याची माहिती शहीर यांनी दै. ’मुंबई तरुण भारत’शी बोलताना दिली. महाराष्ट्रातील गवताळ अधिवासांचा झालेला र्‍हास, भक्ष्याची कमतरता, अशास्त्रीय वृक्षलागवड, लागवडीखाली जाणार्‍या क्षेत्रामुळे लांडग्यांना आपल्या अधिवासाचा परिघ विस्तारावा लागल्याची शक्यता शहीर यांनी वर्तवली आहे. या संशोधनासाठी शहीर यांना दाउत शेख, सारंग म्हामने आणि शिवकुमार बापू मोरे यांचे सहाकार्य मिळाले.


नैसर्गिक खाद्यातील घट गंभीर!
लांडग्यांच्या नैसर्गिक आहारात प्रामुख्याने घट झाल्याचे संशोधनाअंती निदर्शनास आले आहे. लांडग्याच्या आहारातून काळवीटांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यांच्या आहारात समाविष्ट झालेले कुक्कुटपालनातील खाण्याजोगे नसलेले खाद्य ही एक गंभीर समस्या आहे. तसेच लांडग्यांच्या अधिवासात वावरणार्‍या भटक्या कुत्र्यांमुळे देखील त्यांना धोका निर्माण झाला आहे. या दोन्ही समस्यांवर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. - डॉ. शहीर खान, संशोधक

अक्षय मांडवकर

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.