"शरद पवारांचा धृतराष्ट्र झालाय!"

12 Apr 2024 17:54:02

Sharad Pawar 
 
मुंबई : शरद पवारांनी तमाम सासुरवाशीन महिलांचा अपमान केला असून ते पोटच्या पोरीसाठी धृतराष्ट्र झालेले आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील यांनी केली आहे. शरद पवार यांनी मूळ पवार आणि बाहेरुन आलेल्या पवारांमध्ये फरक असतो, असे वक्तव्य केले होते. यावरुन आता त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात येत आहे.
 
रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत पवारांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या की, "शरद पवार साहेब यांच्यासारख्या स्वतःची विशिष्ट प्रतिमा निर्माण करण्यात हयात घालवलेल्या नेत्याने मात्र तमाम सासुरवाशीनींचा हा त्याग मातीमोल ठरवला आहे. सून बाहेरची असते अशा निर्देशाचे संतापजनक वक्तव्य करून तथाकथित पुरुषी मानसिकतेचे दर्शन घडवले आहे. त्यातून त्यांचेही पाय मातीचेच हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे."
 
हे वाचलंत का? -  "छत्रपतींच्या गादीच्या सर्वात मोठा अपमान राऊतांनी केलाय!"
 
"राजकारणात स्वतःची पुरोगामी प्रतिमा निर्माण करण्यासाठी स्वतःभोवती कायम एक प्रभावळ मिरवणाऱ्या शरद पवार साहेब यांनी स्वतःच स्वतःच्या कथनी करनीतून त्या विचारांच्या यापूर्वीही अनेकदा चिंधड्या उडवल्या आहेत. सून परकी, बाहेरची अशा आशयाचे त्यांचे वक्तव्य म्हणजे शरद पवार यांचाही धृतराष्ट्र झाला आहे, हेच सिद्ध होते. कन्या प्रेमाने त्यांनी जणू स्वतःच्या डोळ्यावर पट्टीच बांधली आहे. या आंधळ्या प्रेमात मात्र त्यांनी आई, पत्नी आणि तमाम सासुरवाशींच्या, त्यागाला, त्यांनी जीव जाळून आणि मान मोडून सासरी राबत पार पाडलेल्या कर्तव्याला मातीमोल ठरवून स्वतःचेही पाय मातीचे असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे," असे त्या म्हणाल्या.
 
त्या पुढे म्हणाल्या की, "सासरसाठी प्रसंगी प्राण अर्पण करणाऱ्या, सासरचा मान जपण्यासाठी कायमचे माहेर तोडणाऱ्या सासुरवाशीनींची परंपरा पवार साहेब विसरले आहेत. पोटच्या लेकीच्या आंधळ्या प्रेमापोटी, लेकीसमान सुनांना शरद पवार साहेबांनी प्रचंड दुखावले आहे," असे म्हणत त्यांनी पवारांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0