मुंबई (प्रतिनिधी) : जम्मू-काश्मिरच्या कुपवाडा जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (Ganga Aarti LoC) टिथवाल हे स्थान आहे. येथील जीर्णोद्धार केलेल्या मां शारदा मंदिरात १९४७ च्या फाळणीनंतर पहिल्यांदाच शारदीय नवरात्रीची पूजा झाली. ७५ वर्षानंतर पहिल्यांदाच किशनगंगा नदीच्या काठावर गंगा आरती आयोजित करण्यात आली होती.
मंदिरात प्रार्थना करण्यापूर्वी भाविकांनी किशनगंगा नदीत स्नान केले. यानंतर नदीच्या काठावर नव्याने बांधलेल्या घाटावर आयोजित आरतीमध्येही सहभाग घेतला. गंगा आरतीचे नेतृत्व सेव्ह शारदा कमिटी काश्मीरचे संस्थापक रविंदर पंडिता यांनी केले. ते म्हणाले की, भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीपूर्वी हा घाट अस्तित्वात होता. मात्र १९४७ मध्ये झालेल्या पाकिस्तानी हल्ल्यानंतर येथे पूजा थांबली. केवळ गंगा आरतीच नव्हे तर शारदा मंदिराचेही नुकसान झाले. मात्र आता पुन्हा एकदा मंदिर आणि घाटाचा जीर्णोद्धार करण्यात आला असल्याने यापुढील काळात पूर्वीप्रमाणेच पारंपरिक घाटावर आरती आयोजित करण्यात येईल.
हे वाचलंत का? : रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट! बंगालमधून मतीन ताहा आणि मुसविर हुसैन शाजेबला NIA ने घेतले ताब्यात
'शारदा पीठ' भारतीय सभ्यता आणि संस्कृतीचे केंद्र
हिंदूंचे धार्मिक स्थळ असलेले शारदा पीठ हे सुमारे ५ हजार वर्षे जुने आहे. हे मंदिर पाकिस्तानच्या बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेल्या पाक व्याप्त काश्मिरमध्ये नीलम नदीच्या काठावर आहे. प्राचीन काळापासून काश्मीरला शारदापीठ म्हणजेच शारदा देवीचे निवासस्थान म्हणून ओळखले जाते. आज हिंदू मातेच्या दर्शनासाठी आतुर आहेत, पण पाकिस्तानात असल्या कारणाने येथे सहजासहजी जाता येत नाही.
फाळणीपूर्वी शारदा देवीचे तिथवाल मंदिर हे जगप्रसिद्ध शारदा तीर्थाचे बेस कॅम्प होते. किशनगंगा नदीच्या काठावर असलेले मूळ मंदिर आणि लगतचा गुरुद्वारा १९४७ मध्ये पाकिस्तानी आक्रमकांनी उद्ध्वस्त केला होता. तिथवळ येथील शारदा मंदिराची जीर्णोद्धार हे शारदा पीठातील प्राचीन तीर्थक्षेत्र पुन्हा सुरू करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.