'निष्क्रिये तुझे नाव अनंत गीते'; सुनिल तटकरे यांचा हल्लाबोल

11 Apr 2024 18:49:50
 
sunil tatkare
 
मुंबई - 'निष्क्रिये तुझे नाव अनंत गीते' असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनिल तटकरे यांनी गुरुवार, दि. ११ एप्रिल रोजी महाडमधील महायुतीच्या सभेत केला. शरद पवारांनी वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा घणाघाती आरोप अनंत गीते यांनी केला होता त्याच शरद पवारांचे पाय धरण्याची वेळ तुमच्यावर आली यापेक्षा नैतिक अध:पतन होऊ शकत नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
 
तटकरे म्हणाले, ज्यांनी ज्यांनी अनंत गीते यांना निवडणुकीत मदत केली, त्यांचा विश्वासघात झाला. त्यामुळे विश्वास आणि गद्दारीची भाषा तुम्हाला शोभत नाही. ही लोकसभेची निवडणूक आहे. मात्र बाटली, भूत यावर गीतेंचे रडगाणे सुरू आहे. अहो लोकसभेच्या निवडणूकीत लोकांच्या विकासकामांवर चर्चा केली पाहिजे. याकडे लक्ष न देता आमच्यावर टिका केली जात आहे. मी सभ्यता बाळगतो याचा अर्थ मी कमकुवत आहे असे कुणी समजू नये. चुकीचे बोलून बोट दाखवण्याचा प्रयत्न झाला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही सुनिल तटकरे यांनी टिकाकारांना दिला.
 
हे वाचलत का ?- "ज्यांनी मला माझ्या आईच्या अंत्यसंस्काराला जाऊ दिले नाही तेच लोक आम्हाला हुकूमशहा म्हणत आहेत."
 
महायुतीच्या या जाहीर सभेला शिवसेना मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, युवा नेते विकास गोगावले, जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, संपर्कप्रमुख बंधू तरडे, भाजप शहर सरचिटणीस महेश शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुभाष निकम, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निलेश महाडिक आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

पदरचे पैसे खर्च करून गीतेंना निवडून आणले - गोगावले
 
स्वतःच्या खिशातील पैसे खर्च करून आणि मातोश्रीवरून आलेले पैसे खर्च करून गीतेंना निवडून आणले. त्यानंतर एकदाही या माणसाने आभार मानण्यासाठी फोन केला नाही, इतका हा वाईट माणूस आहे. त्यामुळे आता अनंत गीतेंना बाटलीतही भरायचे आहे आणि टकमक टोकावरून ढकलून द्यायचे आहे. यापुढे कधी या मतदारसंघात उभे राहण्याचे धाडस करणार नाही, असा थेट हल्लाबोल भरत गोगावले यांनी केला.

Powered By Sangraha 9.0