धुळे : काँग्रेसने नुकतेच धुळे लोकसभेसाठी माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांचे नाव घोषित केले आहे. मात्र, त्यांचे नाव जाहीर होताच यावरुन काँग्रेसमध्ये अंतर्गत कलह पाहायला मिळत आहे. शोभा बच्छाव यांच्या नावाला मालेगावातून विरोध करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेसने बुधवारी जालना आणि धुळे लोकसभा मतदारसंघांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. यामध्ये धुळे लोकसभेसाठी शोभा बच्छाव तर जालना लोकसभेसाठी कल्याण काळे यांना उमेदवारी देण्यात आली. मात्र, आता शोभा बच्छाव यांच्या नावाला विरोध करण्यात येत आहे. काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात घोषणाबाजी केल्याचेही सांगण्यात येत आहे. धुळे लोकसभेसाठी स्थानिक उमेदवार देण्याची मागणी पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.
हे वाचलंत का? - "वेळ आल्यास नागपूरचं पालकमंत्रीपद सोडेन पण..."; उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य
दुसरीकडे, या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने दोन बड्या नेत्यांना तिकीट दिले आहे. भाजपने धुळे लोकसभा मतदारसंघात सुभाष भामरे तर जालन्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. परंतू, काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव यांचे नाव जाहीर झाल्याबरोबरच त्यांना विरोध करण्यात येत असल्याने त्यांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.