उद्धव ठाकरेंनी मुंबईसाठी केलेले एक तरी चांगले काम दाखवा!

10 Apr 2024 20:11:40
devendra fadnavis mumbai ubt



मुंबई :     उद्धव ठाकरेंनी महापालिकेची सत्ता असताना गेल्या २५ वर्षांत मुंबईसाठी केलेले एक तरी चांगले काम दाखवावे, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवार, दि. १० एप्रिल रोजी केला. उत्तर मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
 
त्यानंतर गोयल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल पद्म भूषण राम नाईक, आमदार प्रवीण दरेकर, विजय गिरकर, योगेश सागर, अतुल भातखळकर, सुनील राणे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे , शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह, आर.पी.आयचे उत्तर मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.


हे वाचलंत का? -   मान्सूनपूर्व कामांकरिता बीएमसी अॅक्शन मोडवर, आयुक्तांच्या यंत्रणांना सूचना!


फडणवीस म्हणाले, गेल्या १० वर्षांत मोदी सरकारने मुंबईतील सामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवले आहे. मुंबईमध्ये विविध विकास कार्यांचा धडाका लावत प्रत्येक वर्गातील माणसाचे जीवन सुकर करण्याचा विडा केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारने उचलला आहे. यंदाची निवडणूक ही सामान्य माणसाच्या विकासासाठीची निवडणूक आहे. सामान्य माणसाच्या जीवनात कायापालट घडवून आणण्यासाठी मोदी सरकार गेल्या १० वर्षांपासून अथक कार्य करत आहे.

यापुढे पाच वर्षे विकासाचे इंजिन वेगाने धावण्यासाठी देशाची सूत्रे मोदी सरकारच्याच हाती द्यायला हवी. महायुती म्हणजे सर्वसामान्य सर्वांना सामावून घेत सर्वांगीण विकास करणारी रेल्वे आहे. अशा रेल्वे मध्ये आपल्याला बसायचे आहे की विरोधकांच्या वेगवेगळया दिशेने जाणाऱ्या इंजिनच्या रेल्वेत बसायचे आहे हे सूज्ञ मतदारांनी ठरवायचे आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला .


उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा संकल्प

- उत्तर मुंबईला उत्तम मुंबई बनवण्याचा संकल्प महायुतीच्या साथीने प्रामाणिकपणे पूर्ण करेन असे महायुतीचे उमेदवार पियूष गोयल यांनी आश्वस्त केले. मोदी सरकारने सर्वसामान्य माणसाचे भविष्य उज्वल केले आहे.पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला विश्वशक्ती बनवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही असेही त्यांनी नमूद केले.

- भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उत्तर मुंबईच्या प्रत्येक गल्लीत ‘मोदी है तो मुमकिन है’ चा गजर सुरू असल्याने विरोधकांचे धाबे दणाणल्यामुळेच ठाकरे गटाने तर येथून पळच काढला अशी खिल्ली उडवली. पियूष गोयल हे ५ लाखांच्या विक्रमी मताधिक्याने विजयी होणार आणि मुंबईतील सर्वच्या सर्व ६ जागा महायुतीच जिंकणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.




Powered By Sangraha 9.0