मुंबई : महाविकास आघाडीतील सांगली लोकसभेच्या जागेचा प्रश्न सुटला असला तरी काँग्रेसमधील अंतर्गत वाद अजूनही कायम असल्याचे बोलले जात आहे. यातच काँग्रेस नेते विशाल पाटील सांगलीतून वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशाल पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याची माहितीही पुढे आली आहे.
महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि भिवंडी लोकसभेच्या जागेवरून वाद सुरु होता. या जागांवर काँग्रेस, उबाठा आणि शरद पवार गट या तिन्ही पक्षांकडून दावा सांगण्यात येत होता. मात्र, उबाठा गटाने सांगलीमध्ये आपला उमेदवार जाहीर केल्याने येथील काँग्रेसचे नेते विश्वजित कदम आणि विशाल पाटील नाराज होते.
दरम्यान, मंगळवारी महाविकास आघाडीचे अंतिम जागावाटप जाहीर करण्यात आले. यात सांगलीची जागा उबाठा गटाकडे आणि भिवंडीची जागा शरद पवार गटाकडे कायम राहिली. परंतू, या निर्णयामुळे विशाल पाटील नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. यातच त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली असून ते वंचितकडून लोकसभा लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास सांगलीमध्ये तिहेरी लढत पाहायला मिळेल.