मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वाहनाचा मोठा अपघात झाला आहे. भंडारा शहराजवळील भिलवाडा गावाजवळ हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी हा अपघात की, घातपात असा सवाल उपस्थित करत आरोप केला आहे.
नाना पटोले हे प्रचार दौऱ्यावर असताना त्यांच्या उभ्या असलेल्या गाडीला एका ट्रकने मागून जोरदार धडक दिली. त्यामुळे गाडीचे नुकसान झाले आहे. मात्र, सुदैवाने कोणतीही जिवित हानी झाली नसल्याचे बोलले जात आहे. तसेच नाना पटोले हे गाडीमध्ये नसल्याने मोठी हानी टळली.
दरम्यान, या अपघाताबद्दल बोलताना नाना पटोलेंनी एका ट्रकने गाडीला मुद्दाम धडक दिल्याचे म्हटले आहे. तसेच हा अपघात आहे की, घातपात असा सवालही उपस्थित केला. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रत्येकाने एकमेकांची काळजी गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "कोणताही पक्षाचा छोट्यात छोटा कार्यकर्ता असेल किंवा विरोधक जरी असेल तरी कुणाचाही अपघात होऊ नये. शेवटी एक अपघात झाल्याने त्यांच्या परिवाराचं नुकसान होतं आणि कुणाच्याही परिवाराचं नुकसान होऊ नये. विरोधी पक्ष असला तरी प्रत्येकाच्या परिवाराची काळजी एकमेकांनी घ्यायला हवी. तसेच आपल्या महाराष्ट्राचे संस्कार आपण कायम ठेवायला हवेत," असे ते म्हणाले.