मुंबई : उत्तर मुंबईची जागा उबाठाने काँग्रेसच्या माथी मारली असून आता उमेदवार मिळेल का उमेदवार अशी काँग्रेसची अवस्था झाली आहे, असा घणाघात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. उत्तर मुंबई मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या कांदिवली येथील निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुंबईमध्ये निवडणूक सुरु झाल्यानंतर पहिल्या प्रचार कार्यालयाचे उद्धाटन हे उत्तर मुंबईत होत आहे, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. उत्तर मुंबई हा महायूतीचा गड आहे. उत्तर मुंबईमध्ये काँग्रेस आणि उबाठामध्ये 'पहले तुम, पहले तुम' असं सुरु होतं. ही जागा कुणीही घ्यायला तयार नव्हतं. शेवटी उबाठाने ही जागा काँग्रेसच्या माथी मारली आणि आता उमेदवारासाठी काँग्रेसची शोधाशोध सुरु आहे. जसं घर मिळेल का घर म्हणतो तसं आता 'उमेदवार मिळेल का उमेदवार' अशी परिस्थिती काँग्रेसची झाली आहे. याचं कारण त्यांना माहिती आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि मित्रपक्ष या सर्वांची मिळून एक मजबूत यूती आपण तयार केली असून इथले सगळे रेकॉर्ड तोडणार आहोत, असा मला विश्वास आहे," असे ते म्हणाले.
हे वाचलंत का? - वर्षा गायकवाड नॉट रिचेबल! मुंबई काँग्रेसची बैठक रद्द
ते पुढे म्हणाले की, "गेल्या १० वर्षात मोदीजींच्या नेतृत्वात आपल्या सरकारने मुंबईत विकास केला. उद्धवजींच्या अधिपत्याखाली २५ वर्षे मुंबईची महानगरपालिका होती. ज्याने मुंबईचा चेहरा बदलला असं त्यांनी केलेलं एक काम ते दाखवू शकतात का?" असा सवाल त्यांनी उद्धव ठाकरेंना केला. तसेच गेल्या १० वर्षात मुंबईचा चेहरामोहरा बदलण्याचं काम सुरु झालं असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, खा. गोपाळ शेट्टी, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल पद्म भूषण राम नाईक, आमदार प्रवीण दरेकर, विजय गिरकर, योगेश सागर, अतुल भातखळकर, सुनील राणे, मनीषा चौधरी, प्रकाश सुर्वे , शिवसेना प्रवक्त्या शीतल म्हात्रे , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रपाल सिंह, आर.पी.आयचे उत्तर मुंबई अध्यक्ष रमेश गायकवाड आदी उपस्थित होते.