काँग्रेसच्या चोराच्या उलट्या बोंबा!

    01-Apr-2024
Total Views |
Congress Income tax noticeकाँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी प्राप्तिकर खाते म्हणजे भाजपची ‘आघाडीची संघटना’ आहे, असा आरोप केला आहे. प्राप्तिकराची कोट्यवधींची रक्कम काँग्रेस पक्षाने थकवायची, ती वसूल करण्यासाठी त्या खात्याने नोटिसा बजाविल्या, तर त्याचे खापर भाजपवर फोडायचे हा प्रकार म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असाच म्हणावा लागेल.

काँग्रेस पक्षाच्या मागे प्राप्तिकर खात्याचा ससेमिरा लागल्याने त्या खात्याने बजाविलेल्या नोटिसांना सामोरे जाण्याऐवजी, आपल्याला सूडबुद्धीने नोटिसा बजाविण्यात आल्याचा आरोप त्या पक्षाकडून करण्यात आला आहे. खरे म्हणजे प्राप्तिकर खात्याने प्राप्तिकराची १८२३.०८ कोटी रुपये इतकी थकबाकी भरण्याची नोटीस बजावली आहे. ही नोटीस बजाविण्यात आल्यानंतर काँग्रेस पक्षाने हा ‘कर दहशतवाद’ आहे, असा आरोप केला. एक तर इतकी प्रदीर्घ काळ थकबाकी भरायची नाही आणि ती भरण्याची नोटीस बजावले म्हणून कांगावा करायचा, याला काय म्हणायचे लोकसभा निवडणुकांना अवघ्या तीन आठवड्यांचा कालावधी राहिला असताना आपल्या पक्षास जी नोटीस बजाविण्यात आली, ती काँग्रेसला ‘कर दहशतवाद’वाटावी? जी थकबाकी आहे, ती पण लहानसहान रक्कम नाही. १८२३ कोटी एवढी वर्षे ही रक्कम काँग्रेसकडून कशी काय वसूल केली गेली नाही, याचेच आश्चर्य वाटते.

या नोटिसीपाठोपाठ प्राप्तिकर खात्याने काँग्रेस पक्षास शनिवार, दि. ३० मार्च रोजी आणखी तीन नोटिसा बजाविल्या. त्यामध्ये काँग्रेस पक्षाकडे आणखी १ हजार, ७४४ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. ती रक्कम धरून काँग्रेस पक्षाकडे प्राप्तिकर खात्याने ३ हजार, ५६७ कोटी रुपये थकबाकी भरण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे खासदार आणि वकील असलेले विवेक तनखा यांनी यासंदर्भात जी प्रतिक्रिया व्यक्त केले, ती काँग्रेसचे नेते कशा प्रकारे विचार करतात हे दाखविणारी म्हणावी लागेल. तीन दिवसांमध्ये काँग्रेसकडे ३ हजार, ५६७ कोटींची थकबाकी मागणे हा निव्वळ वेडेपणा आहे, असे त्यांनी म्हटले आहे, तर काँग्रेसचे कोषाध्यक्ष अजय माकन यांनी प्राप्तिकर खाते म्हणजे भाजपची ‘आघाडीची संघटना’ आहे, असा आरोप केला आहे. प्राप्तिकराची कोट्यवधींची रक्कम काँग्रेस पक्षाने थकवायची, ती वसूल करण्यासाठी त्या खात्याने नोटिसा बजाविल्या, तर त्याचे खापर भाजपवर फोडायचे हा प्रकार म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असाच म्हणावा लागेल.


प्राप्तिकर खात्याच्या अशा नोटिसा म्हणजे आर्थिकदृष्ट्या काँग्रेसला कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे. पण, अशा गोष्टींपुढे आम्ही नमणार नाही, असे पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी म्हटले आहे, अशा नोटिसांमुळे आम्ही डगमगणार नाही. आम्ही अधिक आक्रमक होऊ आणि आगामी निवडणुका लढू, असेही जयराम रमेश यांनी म्हटले आहे. आपली चूक झाकण्यासाठी भारतीय जनता पक्षानेही सुमारे ४ हजार, ६१७ कोटी रुपये प्राप्तिकर चुकविल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. भारतीय जनता पक्षाने कर सवलत मिळविण्यासाठीच्या ‘अर्ज २४ ए’मध्ये देणगीदारांची नावे आणि पत्ते दिले नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. पण, भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचा हा दावा खोडून काढला असून, काँग्रेसने प्राप्तिकर खाते किंवा न्यायपालिकेवर आरोप करीत राहण्यापेक्षा आपल्या कायदेशीर प्रक्रियेची आणि करदायित्वाची पूर्तता करावी, अशा शब्दात काँग्रेसला सुनावले आहे. दरम्यान, काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी जर सरकार बदलले, तर लोकशाही विघटित करणार्‍यांवर सक्त कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे. अजय माकन काय, जयराम रमेश काय किंवा राहुल गांधी काय, या सर्वांना काँग्रेसने मोठ्या प्रमाणात थकबाकी भरलेली नाही, याची कल्पना आहे. देशात काँग्रेसची किंवा संयुक्त पुरोगामी आघाडीची राजवट असताना, त्या पक्षास विचारणारेच कोणी नव्हते. ‘हम करेसो कायदा’, असा सर्व प्रकार होता. आता नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत हा सर्व गैरव्यवहार उघडकीस येऊ लागल्याने लोकशाही धोक्यात आल्याचा, देशात हुकूमशाही येऊ लागल्याचा साक्षात्कार या सर्व मंडळींना झाला आहे.

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते जाफर इस्लाम यांनी काँग्रेसच्या अपप्रचारास जोरदार उत्तर दिले आहे. काँग्रेस पक्षातील एका कुटुंबास सर्व प्रकारच्या नियमांमधून आपणास सवलत मिळायला हवी, असे वाटते. आपल्यासाठी विशेष कायदा असावा, असे त्यांना वाटते. पण, आधुनिक भारतात ते शक्य नाही, असे त्यांनी म्हटले आहे. आपल्या चुका दाखवून दिल्यावर, त्या मान्य करण्याऐवजी त्यास फाटे फोडण्याची काँग्रेसची परंपरा तशी जुनी आहे. अजय माकन यांनी ‘कर दहशतवाद’ असा आरोप करून त्यातून तेच दाखवून दिले आहे. पण, भ्रष्टाचार करणार्‍यांना, चुकीच्या गोष्टी करणार्‍यांना सोडणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी जी पापे करून ठेवली आहेत, त्यापासून त्यांची सुटका नाही, ही काळ्या दगडावरची रेघ आहे.


हरसिमरत कौर यांचे काँग्रेसला आव्हान!

आपण पंजाबमधील जनतेच्या मागे उभे आहात की, ‘भ्रष्टाचारी’ अरविंद केजरीवाल यांना पाठिंबा देत आहात, याबद्दल काँग्रेस पक्षाने आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या खासदार हरसिमरत कौर बादल यांनी केली आहे. पंजाब काँग्रेसने याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दिल्लीमधील रामलीला मैदानावर जमलेले सर्व नेते, सक्तवसुली संचालनालयाने समन्स बजावूनही ‘ईडी’पुढे हजर न राहिलेल्या व्यक्तीला पाठिंबा देण्यासाठी जमले होते, असे कौर यांनी म्हटले आहे. पंजाबमध्ये काँग्रेस आणि आप एकत्रित आले आहेत, पण मतांसाठी जनतेला भ्रमित केले जात आहे. पण, यावेळी पंजाबची जनता त्यांना सडेतोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याबद्दलही हरसिमरत कौर बादल यांनी टीका केली आहे.


मार्तंड सूर्य मंदिराचा जीर्णोद्धार होणार!

जम्मू-काश्मीरमधील मार्तंड सूर्य मंदिराचा जीर्णोद्धारकरण्याचा निर्णय त्या राज्याच्या प्रशासनाने घेतला आहे. काश्मीरमधील हे सूर्य मंदिर आठव्या शतकातील आहे. हे सूर्य मंदिर देशातील प्राचीन सूर्य मंदिरांपैकी एक आहे. सूर्य मंदिर अनंतनाग येथे असून जीर्णोद्धारकरतेवेळी राजा ललितादित्य याचा पुतळाही त्या प्रांगणात उभारण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी मार्तंड मंदिरास भेट दिली होती. तेथे आयोजित महायज्ञामध्ये ते सहभागी झाले होते. आठव्या शतकात उभारण्यात आलेले हे सूर्य मंदिर काश्मिरी वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होते. पण, मुस्लीम शासक सिकंदर शाह मिरी यांच्या आदेशावरून ते मंदिर उद्ध्वस्त करण्यात आले. मंदिरे नष्ट करणारा हा मुस्लीम शासक स्वत:स सिकंदर बुतशिकन म्हणवून घेत असे. पण, आता जम्मू-काश्मीरमधील या सूर्य मंदिराचा जीर्णोद्धार केला जाणार आहे. सर्व हिंदू समाजासाठी ही अभिमानाची बाब आहे. काश्मीरची समृद्ध सांस्कृतिक परंपरेचे प्रतीक म्हणून हे मंदिर आता पुन्हा उभे राहणार आहे.

दत्ता पंचवाघ
९८६९०२०७३२