"भास्कर जाधव गुवाहाटीला येण्यासाठी बॅग भरून तयार होते!"

09 Mar 2024 18:35:51

Bhaskar Jadhav


मुंबई :
"एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे आमदार जेव्हा गुवाहाटीला होते, तेव्हाच भास्कर जाधव बॅग भरून तेथे येण्यासाठी तयार होते. मात्र, आम्ही भास्कर जाधव यांना पक्षात न घेण्याबाबत भूमिका घेतली होती. त्यांच्यासारखे व्यक्ती आपल्या सोबत नको, अशी भूमिका मी मांडली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी त्यांना येऊ दिले नाही," असा गौप्यस्फोट शिवसेना आमदार योगेश कदम यांनी केला आहे.
 
मुंबई येथे माध्यमांशी संवाद साधताना ते म्हणाले की, "स्वतःचे सगळे कसे खरे आहे, हे रेटून द्यायचे आणि पक्षांतर्गत वाद निर्माण करायचे, याव्यतिरिक्त त्यांना काहीही येत नाही. शिवसेना-भाजपशी मजबूत पकड जेव्हा बसत होती, तेव्हाच त्यांना घ्यायला आम्ही नकार दिला होता. ते यायला तयार होते मात्र, त्यांना पक्षात घ्यायला आम्ही तयार नव्हतो. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत, रामदास कदम आणि मला माहिती असल्याचेही ते म्हणाले."
हे वाचलंत का? - "पुन्हा 'बंद खोलीतील' रडगाणे..."; बावनकुळेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
 
उदय सामंत यांनी नकार दिला!
 
"आम्ही ज्यावेळेस गुवाहाटीमध्ये होतो त्यावेळी भास्कर जाधव येण्यास तयार होते. मात्र एकनाथ शिंदे यांनी उदय सामंत आणि मला याबाबत माहिती दिली. त्यावेळी उदय सामंत, मी आणि रामदास कदम या सर्वांनी भास्कर जाधव यांना पक्षात घेण्यास नकार दिला. आम्ही आमची स्पष्ट भूमिका मांडली. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भास्कर जाधव यांना गुवाहाटीला येऊ दिले नसल्याचा दावा आमदार योगेश कदम यांनी केला आहे."



Powered By Sangraha 9.0