कोल्हापूर : काँग्रेसमध्ये बरेच सुपारीबहाद्दुर आहे. या सुपारीबहाद्दुरांना आवरलं नाही तर निवडणुकीनंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. ते इचलकरंजी येथील सभेत बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "महाविकास आघाडीशी आमची युती व्हावी ही आमची भावना आहे. पण एकमेकांच्या विरोधात कुरघोडी करणाऱ्या काँग्रेसवाल्यांनी सांगावं की, आतापर्यंत काँग्रेसच्या अध्यक्षांवर ईडीची चौकशी आहे की, नाही? ईडीची चौकशी असल्यामुळे ते भाजपच्या विरोधात अजिबात भुमिका घेत नाहीत अशी परिस्थिती आहे."
हे वाचलंत का? - "२६ जुलैच्या पुरावेळी उद्धव ठाकरे वडिलांना सोडून हॉटेलवर गेले!"
"आज ते आपल्याला शहाणपणा सांगायला निघालेत की, तुम्ही भाजपला मदत करणार आहात. अरे नालायकांनो, तुम्ही निवडणुक लढवू नका आम्ही भाजपला संपवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेसला नवीन, चांगल्या आणि जो जिंकून येईल अशा कार्यकर्त्याला उमेदवारी द्यायची नाही पण घराणेशाही पोसत राहायची आहे," असा टोला त्यांनी लगावला.
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेसमध्ये बरेच सुपारीबहाद्दुर आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंना आमचा सल्ला आहे की, काँग्रेसमधील हे सुपारीबाज ओळखून त्यांना फेकून द्या. काँग्रेस वाढायला सुरुवात होईल. काँग्रेसवाल्यांनो तुम्ही भुरटे चोर आहात हे कबुल करा. या सुपारीबहाद्दुरांना आवरलं नाही तर निवडणुकीनंतर तुम्ही जेलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाहीत," असेही ते म्हणाले.