नागपूर : "ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्याला ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, असं सांगण्यासारखं आहे, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. त्यांनी शुक्रवारी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आपल्या पक्षात येण्याची ऑफर दिली होती. याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्या पक्षाचा बँडबाजा वाजला त्या पक्षाच्या अध्यक्षांनी गडकरीजींसारख्या राष्ट्रीय नेत्याला ही ऑफर देणं म्हणजे एखाद्या गल्लीतल्या व्यक्तीने तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला अमेरिकेचा राष्ट्रपती बनवतो, असं सांगण्यासारखं आहे."
हे वाचलंत का? - फडणवीसांनी दाखवला सुप्रिया सुळेंना आरसा! शरद पवारांच्या कारकिर्दीतील 'त्या' घटना...
ते पुढे म्हणाले की, "खरंतर गडकरी साहेब हे आमचे मोठे नेते आहे. जेव्हा महाराष्ट्राचा नंबर येईल तेव्हा ते नागपूरमधून लढतील. ज्यावेळी पहिली यादी झाली त्यावेळी आमच्या महायुतीचा निर्णय झाला नसल्याने महाराष्ट्राच्या जागांबाबत आम्ही चर्चा केली नाही. ज्यावेळी चर्चा होईल तेव्हा सर्वात आधी नितीन गडकरींचं नाव येईल. त्यामुळे उद्धवजी स्वत:ला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याने त्यांचं हसं होत आहे," असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "मावळमध्ये गोळीबार झाला त्यावेळी कोणाचं सरकार होतं? किंवा राज्यातील ११३ गोवारींचा पोलिसांच्या लाठीचार्जमध्ये मृत्यू झाला तेव्हाचं सरकार कोणतं होतं. सुप्रियाताई सध्या विरोधी पक्षाच्या मोडमध्ये असल्याने त्या रोज अशी वक्तव्यं करतात. त्यामुळे फार एवढं गांभीर्याने घेण्याचं कारण नाही," असे ते म्हणाले.