पुणे : लक्षात ठेवा माझं नाव शरद पवार आहे. मी या रस्त्याने कधी जात नाही. पण, या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी सोडतही नाही, असे म्हणत शरद पवारांनी अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांना धमकी दिली आहे. गुरुवारी लोणावळ्यामध्ये शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.
शरद पवार म्हणाले की, "काही लोकांनी आणि आमदाराने आजच्या बैठकीला तुम्ही येऊ नये म्हणून दमदाटी केली. लोकशाहीमध्ये नेत्याची एखादी गोष्ट चुकली तर टीका करायची नाही का? जाहीर बोलायचं नाही का? आणि बोललं तर दमदाटी म्हणतात. मला त्यांना सांगायचं आहे की, बाबा रे तू आमदार कोणामुळे झालास? तुझ्या सभेला इथे कोण आलं होतं? त्यावेळी तुझ्या पक्षाचा अध्यक्ष कोण होता? फॉर्म भरायला चिन्हासाठी नेत्याची सही लागते, ती सही माझी आहे."
हे वाचलंत का? - प्रकाश आंबेडकरांनी हट्ट सोडावा! राऊतांचा सल्ला
"ज्यांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी घाम गाळला तुम्ही आज त्याच पक्षाच्या आणि विचारांच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करता? माझी विनंती आहे की, एकदा दमदाटी केली बस झालं. पुन्हा असं काही केलं तर शरद पवार म्हणतात मला. मी या रस्त्याने कधी जात नाही. पण, या रस्त्याने जाण्याची स्थिती कोणी निर्माण केली तर मी सोडतही नाही," असा थेट इशाराच शरद पवारांनी सुनील शेळके यांना दिला आहे.