संदेशखालीतील पीडित महिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून देशभरातील ८०० ठिकाणी (ABVP Protest 800 places) जोरदार निदर्सने करण्यात आली.

नवी दिल्ली : संदेशखालीतील पीडित महिलांना न्याय मिळावा या मागणीसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) नेतृत्वाखाली डीयू, जेएनयू, जामियाच्या विद्यार्थ्यांनी दिल्लीतील बंगा भवन येथे जोरदार निदर्शने केली. देशभरातील विद्यार्थ्यांनी कोलकाता, मुंबई विद्यापीठ परिसर, बीएचयू कॅम्पस, देवी अहिल्या विद्यापीठ इंदूर, राजस्थान विद्यापीठ परिसर, हैदराबाद विद्यापीठ परिसरात निदर्शने केली. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांकडून संदेशखालीतील महिलांवर होणारे बलात्कार आणि जमीन बळकावण्याच्या घटनांच्या निषेधार्थ ८०० हून अधिक ठिकाणी अभाविपकडून निदर्शने करण्यात आली.
हेही वाचा : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये अभाविपची तीव्र निदर्शने
राज्याच्या राजधानी आणि जिल्हा केंद्रांसह विविध ठिकाणी झालेल्या निदर्शनांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि तरुण सहभागी झाले होते. त्यांनी यावेळी ममता बॅनर्जी सरकारच्या अपयशाचा निषेध करत संदेशखाली घटनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. निदर्शनानंतर अभाविपने जिल्हाधिकारी व सक्षम अधिकारी यांच्यामार्फत राष्ट्रपतींना उद्देशून निवेदन दिले. ज्यामध्ये केंद्रीय यंत्रणांकडून उच्चस्तरीय चौकशी, आरोपींवर कारवाई, पीडितांना कायदेशीर मदत, स्थलांतर रोखण्यासाठी पावले उचलण्याची मागणी करण्यात आली आहे.
अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल म्हणाले, "संदेशखालीची घटना, पश्चिम बंगालमध्ये महिलांवर झालेले अत्याचार आणि तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी ज्याप्रकारे उपद्रव केला, त्यामुळे संपूर्ण देशातील युवक अत्यंत दु:खी आहेत. हे अत्यंत लाजिरवाणे आहे. देशभरातील हजारो विद्यार्थ्यांनी ममतांच्या क्रूरतेविरोधात आवाज उठवला आहे, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांच्या न्यायाच्या लढ्यात संपूर्ण देशातील तरुण पीडितांच्या पाठीशी आहेत."
हेही वाचा : अभाविपचे देशव्यापी आंदोलन ममतादीदींना पडणार भारी?
राष्ट्रीय मंत्री शिवांगी खरवाल म्हणाल्या, “पश्चिम बंगालमध्ये महिलांवर बलात्कार करणारे लोक महिनोनमहिने मोकळे फिरतात, पण जेव्हा आमच्यासारखे विद्यार्थी पश्चिम बंगालमध्ये अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात, तेव्हा त्यांना पकडण्यासाठी आणि प्रताडित करण्यासाठी पोलिसांना फक्त एक तास लागतो. तेव्हा विलंब होत नाही. पश्चिम बंगालमधील महिलांना न्याय मिळावा, या मागणीसाठी देशभरातील मुली आंदोलन करत आहेत. आम्ही महामहीम राष्ट्रपतींकडे मागणी करतो की संदेशखळी घटनेतील आरोपींवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्या लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी."
राष्ट्रीय मंत्री शालिनी वर्मा म्हणाल्या, “कोलकाता येथे आंदोलनादरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांना ज्या प्रकारे मारहाण केली ते अत्यंत दुर्दैवी आहे. आज देशभरातील हजारो विद्यार्थी महिलांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात एकवटले आहेत, आमची मागणी आहे की कोणत्याही गुन्हेगाराला सोडले जाऊ नये आणि महिलांवर अत्याचार करण्याचे धाडस कोणी करू नये, अशी कठोर कारवाई केली जाईल."