मुंबई : बहुरुपी आले रे.. बहुरुपी आले, असा खोचक टोला मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उबाठा गटाला लगावला आहे. तसेच हिंदुत्वाला तिलांजली देऊन उबाठा नामक गट "समाजवादी" झाला असल्याचेही ते म्हणाले आहेत. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला.
आशिष शेलार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "उद्धव ठाकरे प्रभू श्रीराम काल्पनिक मानणाऱ्या काँग्रेससोबत सत्तेचे वाटेकरी झाले. भारत तेरे तुकडे हो हजार असे म्हणणाऱ्यांचे पाठीराखे झालेत. तसेच देव न मानणाऱ्या स्टॅलिन सोबत गेले. त्यांनी याकूबची कबर सजवली आणि मराठी मुस्लिमांसोबत बिर्याणीच्या 'पंगतीत' जाऊन बसले. हिंदुत्वाला तिलांजली देऊन हल्ली हल्ली तर उबाठा नामक गट 'समाजवादी' झाले."
"त्यामुळे मार्क्सवादी, माकपा, भाकपा सगळ्या जगभरातील विचारसरणी कवटाळून झाल्या असतील तर आता महाराष्ट्र उबाठा गटाला विचारतोय की, नेमकी आयडालॉजीच्या बाबतीत तुमची इयत्ता कंची? आयडालॉजी तडीपार आणि रोज गळ्यात नवा हार, अशी उबाठाची परिस्थिती आहे. म्हणूनच आम्ही महाराष्ट्राला सांगतोय, सावधान.. सावधान.. सावधान बहुरुपी आले रे ... बहुरुपी आले," असेही शेलार आपल्या पोस्टमध्ये म्हणाले आहेत.