"काँग्रेसला बाहेर ठेवण्यासाठी उबाठा आणि शरद पवार गटाच्या गुप्त बैठका!"

    04-Mar-2024
Total Views |

Sharad Pawar & uddhav Thackeray


मुंबई :
काँग्रेसला बाहेर कसं ठेवायचं यासाठी उबाठा आणि शरद पवार गटाच्या गुप्त बैठका सुरु आहेत. शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याच्या घरी या बैठका सुरु आहेत, असा गौप्यस्फोट भाजप आमदार नितेश राणेंनी केला आहे. सोमवारी ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
 
नितेश राणे म्हणाले की, "काँग्रेसला बाहेर कसं ठेवायचं यासाठी उबाठा आणि शरद पवार गटाच्या गुप्त बैठका सुरु आहेत. शरद पवार गटाच्या एका मोठ्या नेत्याच्या घरी या बैठका सुरु आहेत. उबाठा आणि शरद पवार गट हे महाविकास आघाडीमध्ये लढणार नसून ते काँग्रेसला एकटं पाडण्याच्या तयारीत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत हे दिसेल."
 
"ते पत्रकार परिषदेत नुसते प्रकाश आंबेडकरांचे गोडवे गात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, संविधान आणि त्यांना माननाऱ्या वर्गाची सर्वात जास्त काळजी कुणी घेतली असेल तर ती नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारने घेतली आहे. त्यांच्यासाठी असंख्य महत्वाच्या योजना आणल्या आहेत. संविधान कसं घट्ट करायचं याचं उत्तम उदाहरण गेल्या दहा वर्षांत देशाला मिळालं आहे. संजय राऊतांच्या मालकाने मातोश्रीवर आलेले प्रकाश आंबेडकरांचे साधे दोन फोनही उचलले नाहीत आणि आता तेच त्यांचे गोडवे गात आहेत. ते प्रकाश आंबेडकारांना धोका देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आमच्याकडे आहे. येणाऱ्या दिवसांत ही माहिती बाहेर येईल," असे नितेश राणे म्हणाले.
 
 
ते पुढे म्हणाले की, "रोज सकाळी उठून सातत्याने देशाच्या पंतप्रधानांवर बोललं की, दिवसभर बातम्यांमध्ये राहायला मिळतं, ही संजय राजाराम राऊतांची सवय झाली आहे. पण आता अशी अवस्था झालेली आहे की, रोज सकाळच्या यांच्या पत्रकार परिषदेमुळे सामान्य नागरिक तर सोडाच पण महाविकास आघाडीतील असंख्य नेते हळूहळू कमीकमी होत चालले आहेत. अजितदादा आणि अशोक चव्हाण बाजूला गेलेत. प्रकाश आंबेडकरसुद्धा त्यांच्यासोबत युती करायला तयार नाहीत. त्यामुळे ते जे काही बोलतात त्याला किती किंमत द्यायची, याबद्दल महाराष्ट्राची जनता आता विचार करायला लागली आहे."
 
मविआ सरकारमध्ये दिलेले किती शब्द पुर्ण केलेत?
 
"देशाचे पंतप्रधान शेतकरी आंदोलन चिरडू पाहत आहेत, हे आंदोलन शेतकरी मोदीजींच्या धोरणांमुळे करत आहेत. केंद्र सरकार त्यांच्याशी संवाद साधत नाहीत, असा आरोप राऊतांनी केला. परंतू, ज्या व्यक्तीला स्वत:चा पक्ष, स्वत:चं घर सांभाळता आलं नाही, ज्यांचं कुटुंब भ्रष्टाचारामध्ये बरबटलेलं आहे आणि अतिरेक्यांशी संबंध आहे ते संजय राऊत आता देशाच्या पंतप्रधानांना सल्ले देत आहेत. पण स्वत:चा मालक जेव्हा महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शेतकऱ्यांना, मुंबईकरांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला जे शब्द दिलेत ते त्यांनी आठवावे. यातील किती शब्द पुर्ण केलेत याबद्दल थोडा विचार करावा. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन मी सत्तेत आल्यावर तुम्हावा एवढं एवढं देतो असे असंख्य भाषणं फिरत आहेत. पण त्यातली एक दमडीही शेतकऱ्यांना देऊ शकले नाही," असे ते म्हणाले.
 
तसेच "कोकणातल्या शेतकऱ्यांना ५० हजार प्रोत्साहनपर निधी देतो असं ठाकरेंनी विधिमंडळात जाहीर केलं. पण किती कोकणातल्या शेतकऱ्यांना तो निधी मिळालाय? सत्तेत आल्यावर मुंबईकरांना असंख्य सवलती देतो असे ते म्हणले होते. त्यातला एकही निर्णय ते घेऊ शकले नाहीत आणि हे आमच्याबद्दल देणगीची भाषा करतात. तुमच्या मालकाच्या कर्जतच्या फार्महाऊसमध्ये सुशांतसिंह राजपूतच्या संदर्भात विचापपूस करायला एक पत्रकार गेला. तुमच्या सरकारने त्याला भर रस्त्यात अटक करुन तुरुंगात टाकलं आणि हे आम्हाला सल्ले देत आहेत. आधी तुमच्या महाविकास आघाडीचं काय होतं ते बघा," असा टोलाही राणेंनी ठाकरे आणि राऊतांना लगावला आहे.