आयकर विभागाकडून काँग्रेसला पुन्हा दणका, करवसुली रक्कम ३००० कोटी!

    31-Mar-2024
Total Views |
new-income-tax-notice-congress


नवी दिल्ली :   आयकर विभागाकडून काँग्रेस पक्षाला आणखी एक नवीन नोटीस बजावण्यात आली आहे. आयकर विभागाने काँग्रेस पक्षाला २०१६-१७ वर्षाकरिता ४१७ कोटी रुपयांची कर वसुलीची नोटीस पाठविण्यात आली आहे. दरम्यान, याआधीच आयकर विभागाकडून दि. २८ मार्च रोजी १७०० कोटींच्या करवसुलीची नोटीस पाठवण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाकडून करवसुलीकरिता नोटीस पाठविण्यात आली आहे.
 
दरम्यान, नोटीसमध्ये २०१४-१५ ते २०१६-१७ या मूल्यांकन वर्षासाठी १,७४५ कोटी रुपयांच्या कराची मागणी करण्यात आली आहे. वर्षानुसार, आयकर विभागाने २०१४-१५ साठी ६६३ कोटी रुपये, २०१५-१६ साठी सुमारे ६६४ कोटी रुपये आणि २०१६-१७ साठी सुमारे ४१७ कोटी रुपये करवसुली काँग्रेस पक्षाकडून मागितले आहेत.


काँग्रेस पक्षाला आयकर विभागाकडून मिळालेल्या नोटिशीनुसार, सुमारे १,८२३ कोटी रुपये भरण्यास सांगितले आहे. मागील वर्षीच्या कर मागण्यांसाठी पक्षाच्या खात्यातून १३५ कोटी रुपये आधीच काढण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला होता, त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. आता या प्रकरणाची सुनावणी १ एप्रिलला होण्याची शक्यता आहे.

माहिती शेअर करताना काँग्रेसने या नोटिसा आणि आयकर विभागाच्या वसुली कारवाईवर आरोप केला होता की सरकार निवडणुकीपूर्वी त्यांची खाती जप्त करत आहे. निवडणूक लढवण्यासाठीही पक्षाकडे निधी नाही, त्यामुळे प्रचारावर पैसे खर्च करता येत नाहीत, असे काँग्रेसने म्हटले आहे. आयकर विभागाने या आरोपांना उत्तर दिले होते की ते केवळ त्यांची वसुली करत आहेत आणि कोणतीही खाती गोठवली नाहीत. यावर अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, काँग्रेस हा निवडणुकीचा मुद्दा बनवत आहे.