"उद्धवजींना सख्ख्या भावाच्या विरोधात कोर्टात का जावं लागलं?"

आशिष शेलारांचा सवाल

    31-Mar-2024
Total Views |
 
Uddhav Thackeray
 
मुंबई : उद्धवजी तुम्हाला सख्ख्या भावाच्या विरोधात कोर्टात का जावं लागलं? असा सवाल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना केला आहे. रविवारी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधताना ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेला शेलारांनी प्रत्युत्तर दिले.
 
आशिष शेलार म्हणाले की, "संपुर्ण देश मोदीजींचं कुटुंब आहे. पण उद्धवजी तुम्हाला सख्ख्या भावाच्या विरोधात कोर्टात का जावं लागलं? तुमच्या कुटुंबातील चुलत भावाला तुम्ही घरातून का काढलं? तुमच्या सख्ख्या वहिनी तुम्हाला का सोडून गेल्या? या प्रश्नांची उत्तरं कुटुंब म्हणून तुम्ही कधी देणार आहात का?," असा सवाल त्यांनी केला आहे.
 
हे वाचलंत का? -  आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात अरविंद सावंतांच्या विरोधात पोस्टरबाजी!
 
"डुबते को तिनके का सहारा ही म्हण उद्धवजींना लागू होते. महाराष्ट्रात कधीही स्वत:च्या बळावर निवडणूकीत उभा न राहणारा कुणी नेता असेल तर ते उद्धवजी आहेत. हिंमत असेल तर त्यांनी एकट्याने उभं राहून भाजपशी सामना करावा," असे आवाहनही शेलारांनी ठाकरेंना दिले आहे.
 
ते पुढे म्हणाले की, "मी उद्धवजींच्या गाडीमध्ये पेट्रोल टाकायला तयार आहे. त्यांची इलेक्ट्रिक कार असेल तर त्यात कनेक्शन द्यायला तयार आहे. मणिपूर जाऊद्या उद्धवजींनी मुंबईतल्या मालवणी भागात जावं आणि तिथल्या बांधवांवर होणाऱ्या अत्याचारावर आवाज उठवावा, असं माझं त्यांना थेट आव्हान आहे. उद्धवजींसारखा दोगला माजी मुख्यमंत्री मी पाहिलेला नाही. ही लोकं जेव्हा उद्धव ठाकरेंसोबत होती तेव्हा ती सर्फ सारखी सफेद होती. पण आता ती जेव्हा त्यांची विचारधारा सोडून बाहेर गेलीत तेव्हा ती उद्धवजींना भ्रष्ट दिसू लागली आहेत. उद्धवजी तुम्ही कॅमेराचे लेन्स बदलता हे माहिती होतं पण त्याबरोबर भ्रष्ट आणि अभ्रष्ट ठरवणाऱ्या दुषित लेन्सचा वापर कधीपासून करायला लागलेत?," असेही ते म्हणाले.