राष्ट्रपतींकडून दिग्गजांना 'भारतरत्न' पुरस्कार प्रदान, पंतप्रधानांकडून योगदानाचे स्मरण!

    30-Mar-2024
Total Views |
receive-bharat-ratna-from-president-droupadi-mumru
 

नवी दिल्ली :     यंदाचा भारतरत्न पुरस्कार जाहीर झालेल्या बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा जननायक कर्पूरी ठाकूर, माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामीनाथन, माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह या दिग्गजांना मरणोत्तर सर्वोच्च नागरी पुरस्कार 'भारतरत्न' प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनात हा प्रदान सोहळा पार पडला असून यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


 
या दिग्गज व्यक्तिमत्त्वांच्या कुटुंबीयांकडून भारतरत्न सन्मान स्वीकारण्यात आला असून याक्षणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिग्गजांच्या योगदानाचे स्मरण केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, "चौधरी चरणसिंग यांना 'भारतरत्न' हा देशाच्या विकासात, विशेषतः कृषी आणि ग्रामीण विकासासाठी त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी सन्मान आहे.", अशी भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली.

ते पुढे म्हणाले, “शेती जगतातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, डॉ एमएस स्वामीनाथन हे अनुवांशिक आणि कृषी विज्ञान क्षेत्रातील संशोधन कार्यासाठी ओळखले जातात. अन्न उत्पादनात संघर्ष करणाऱ्या भारताला स्वावलंबी होण्यासाठी त्यांनी प्रेरित केले असून त्यांना ‘भारतरत्न’ दिल्याने लोकांना कृषी आणि अन्नसुरक्षा क्षेत्रात संशोधन करण्याची प्रेरणा मिळेल, असेही ते यावेळी म्हणाले.
 

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह व बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा जननायक कर्पूरी ठाकूर यांच्यादेखील कार्याचा उल्लेख पंतप्रधानांनी केला आहे. “कर्पूरी ठाकूर यांना ‘भारतरत्न’ ही खरी श्रद्धांजली आहे ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सामाजिक न्याय आणि समानतेसाठी समर्पित केले. जननायक हे समाजातील अत्यंत मागासलेल्या घटकांचे मसिहा म्हणून ओळखले जातात. समाजातील उपेक्षित लोकांच्या उन्नतीसाठी त्यांनी आपले बहुमोल योगदान दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान म्हणाले की, पीव्ही नरसिंह राव यांनी आपल्या देशाची प्रगती आणि आधुनिकीकरण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले. ते एक आदरणीय विद्वान आणि विचारवंत म्हणूनही ओळखले जातात, त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.