नवमतदारांना आपलेसे वाटणार ‘टेक ब्रो’ मोदी!

    30-Mar-2024
Total Views |
new voters tech bro modi


नवी दिल्ली (पार्थ कपोले) :     पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांच्याशी साधलेला संवाद असो की नुकतेच सोशल मिडिया इन्फ्लुएंसर्ससोबतचा कार्यक्रम असो; देशातील कोट्यवधी नवमतदारासांठी पंतप्रधान आता ‘टेक ब्रो’ ठरत आहे, यात कोणतीही शंका नाही.

राजकीय नेते म्हणजे पांढरा झब्बा, त्यावर चुरगळलेला पायजमा आणि तोंडी अगम्य अशी भाषा; असेच स्वरूप देशात दीर्घकाळ होते. देशातील बहुसंख्य नेते आपापल्या काळात त्या काळाची भाषा बोलण्यास असमर्थ होते. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करणे तर दूरची गोष्ट होती. परिणामी देशातील तरूण मतदार आणि राजकीय नेते यांच्यामध्ये अंतर निर्माण झाले होते.

अगदी २००७ – ०८ च्या काळातही, जेव्हा भारतात समाजमाध्यमे येऊ लागली होती; तेव्हादेखील राजकीय नेते त्यापासून फटकून राहत होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा बदल नेमकेपणाने हेरला होता. त्यामुळेच २००९ सालीच त्यांचे ट्विटरवर (आताचे ‘एक्स’) खाते होते. त्याचवेळी तरूण नेता असल्याचे सांगणारे राहुल गांधी हे एप्रिल २०१५ मध्ये ट्विटरवर दाखल झाले होते.
 

हे वाचलंत का? - भारतातील प्रत्येक गावात पोहोचवणार डिजीटल तंत्रज्ञान : पंतप्रधान नरेंद्र मोदी
 

नव्या बदलांना स्वीकारुन त्यांना आपलेसे करण्यात देशात सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हात कोणीही धरू शकत नाही. काही महिन्यांपूर्वी जेव्हा व्हॉट्सॲपने “व्हॉट्सॲप चॅनेल” हे वैशिष्ट्य सुरू केले, तेव्हा त्याचा तत्काळ वापर सुरू करणाऱ्या पहिल्या मोजक्याच लोकांमध्ये पंतप्रधानांचा समावेश होता. आजही या चॅनेलवर ते अतिशय सक्रिय आहेत.
 
केवळ व्हॉट्सॲप चॅनेल नव्हे तर इन्स्टाग्राम या आजघडीच्या सर्वांत लोकप्रिय ॲपवर येणारे पंतप्रधानांचे रील्स, व्हिडीओ आणि फोटोजही लोकप्रिय होतात. समाजमाध्यमांवर काय लिहावे, कसे लिहावे, कशा पद्धतीने एखादा फोटो अथवा व्हिडीओ वापरावा यामध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदी एक्सपर्ट असल्याचे दिसते. त्यामुळे नरेंद्र मोदी ॲपदेखील त्यांन अशाचप्रकारे अद्ययावत ठेवले आहे. विशेष म्हणजे समाजमाध्यमावरील त्यांचा वावर हा ७३ वर्षीय नेत्याचा असल्याचे अजिबात वाटत नाही. त्यामुळेच पॉडकास्ट असो की एआय, फेसबुक असो की रिल्स आणि स्नॅपचॅट असो की एक्स; या सर्व ठिकाणची भाषा पंतप्रधान मोदी सहजपणे बोलू शकतात.

 
मुलाखत एक, परिणाम अनेक


बिल गेट्स यांच्यासोबतच्या संवादामुळे पंतप्रधानांनी एकाचवेळी अनेक संदेश दिले आहेत.
 
१. नवमतदार – मी तुमच्यासारखीच भाषा बोलू शकतो. आमच्या सरकारच्या कार्याची चर्चा जगभरात होते आहे.

२. कॉर्पोरेट मतदार – विविध कंपन्यांमध्ये नोकरी करणाऱ्या कॉर्पोरेट मतदारांच्या मनात विश्वास निर्माण करण्यात यश. भारतात एआय ते डिजीटल अशा सर्व क्षेत्रात भरपूर काम होत असून भारतातच भरपूर संधी उपलब्ध होत आहे. संपूर्ण जगात आज भारताची स्विकारार्हता आहे.

३. लहान शहरांतील मतदार – “यशस्वी होण्याचे अनेक मार्ग उपलब्ध आहेत. त्यासाठी शहरातच जाण्याची गरज नाही”.

४. मध्यमवर्ग – २०१४ आणि २०१९ साली योग्य निवड केल्याचे समाधान आणि २०२४ ला त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा विश्वास.

५. मातृभाषेत बोला, काही बिघडत नाही – मुलाखतीमध्ये गेट्स यांच्या इंग्रजी प्रश्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंदीत उत्तरे देत होते. त्यामुळे “प्रगतीची भाषा केवळ इंग्रजी नाही, तुम्ही तुमच्या मातृभाषेतही बोलू शकतात”, हा अतिशय महत्त्वाचा संदेश दिला आहे.