लोकसभा निवडणुकीसाठी राज्य सज्ज, ४८ मतदारसंघांमध्ये १ हजार ६५६ भरारी पथके!

निवडणूक काळातील गैरप्रकारांवर ठेवणार करडी नजर

    30-Mar-2024
Total Views |
Loksabha Election 2024 Maharashtra


मुंबई :   लोकसभा निवडणूक काळात गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये १ हजार ६५६ भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. या माध्यमातून अवैध रोख रक्कम, दारू, ड्रग्जवर करडी नजर ठेवली जात असून, त्यांच्या दिमतीला २ हजार ९६ गस्ती पथके देण्यात आल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी दिली.
 
महाराष्ट्र राज्यासाठी विशेष निरिक्षक म्हणून निवृत्त आयएएस अधिकारी धर्मेंद्र गंगवार आणि विशेष पोलीस निरिक्षक म्हणून निवृत्त आयपीएस अधिकारी एन. के. मिश्रा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यामध्ये या निवडणूकीसाठी ९८ हजार ११४ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे.
 कायदा आणि सुव्यवस्था यंत्रणेमार्फत २८ मार्चपर्यंत २७ हजार ७४५ शस्त्रास्त्रे जमा, तसेच १९० शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. परवाना नसलेली ५५७ शस्रे जप्त करण्यात आली असून, राज्यात आचारसंहिता लागू झाल्यापासून सीआरपीसी कायद्यांतर्गत २७ हजार ६८५ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचे आल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी १९० अंतिम मुक्त चिन्हे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच सहा राष्ट्रीय आणि चार राज्यस्तरीय पक्षांना मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे राज्यभरामध्ये विविध राजकीय पक्षांच्या २४१ प्रमुख प्रचारकांना परवानगी देण्यात आली आहे.
 
निवडणूक काळातील जप्तीची कारवाई

रोख रक्कम - ३३.१२ कोटी

दारु - १९.३४ कोटी

ड्रग्ज - १८६ कोटी

मौल्यवान धातू - ४०.२३ कोटी

इतर - ६३.५९  कोटी 

एकूण - ३४२.२९ कोटी


दिव्यांग, ज्येष्ठांना घरातून मतदानाची सुविधा

लोकसभा निवडणुकीसाठी अंध मतदारांच्या सुलभता करिता त्यांना ब्रेल लिपीमधील मतदार माहिती चिठ्ठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्यातील एकूण मतदारांच्या संख्येमध्ये सद्यस्थितीत १ लाख १६ हजार ५१८ अंध मतदार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने ४० टक्के दिव्यांगत्व असलेल्या आणि ८५ वयावरील जेष्ठ नागरिकांमधील इच्छूक मतदारांना घरातून मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. राज्यभरातून आतापर्यंत १७ हजार ८५० ज्येष्ठ मतदारांचे तसेच ४० टक्के दिव्यांगत्व असलेल्या ५ हजार ४५३ दिव्यांग मतदारांचे गृहमतदानासाठी अर्ज प्राप्त झाले आहेत.
- एस. चोक्कलिंगम्, मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य