मुंबई : थॅलेसेमिया या दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या कर्जमधील (रायगड) १३ वर्षीय वेदांत ठाकरेसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'सुपर हिरो' ठरले आहेत. एका कार्यकर्त्यामार्फत फडणवीस यांना वेदांतविषयी माहिती कळल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यालयातील यंत्रणा कामाला लावली आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले. तो या आजारातून बरा झाल्यानंतर सागर या निवासस्थानी उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहोचला. त्यांनीही अत्यंत मायेने त्याची विचारपूस करीत उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
याविषयी माहिती देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, परिस्थितीवर मात करून, खचून न जाता लढणारे फार कमी असतात. त्यापैकीच एक म्हणजे वेदांत ठाकरे. काही महिन्यांपूर्वी वेदांतच्या पालकांनी एका भाजप कार्यकर्त्यामार्फत मला संपर्क केला. थॅलेसेमियामुळे वेदांतवर उद्भवलेली कठीण व गंभीर परिस्थिती त्यांनी मांडली. माझ्या कार्यालयाने प्रयत्न केले. वेदांतवर मुंबईत उपचार सुरू झाले. या आजाराचा उपचार म्हणजे जणू एक कठीण परीक्षाच; पण वेदांत हिमतीने पुढे गेला आणि त्याने या गंभीर आजारावर मात केली.
आज वेदांतने कुटुंबासमवेत माझ्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. वेदांत आणि त्याच्या कुटुंबियांच्या या खडतर प्रवासात मी त्यांची साथ देऊ शकलो, याबद्दल मी स्वतः ला भाग्यवान समजतो. आज वेदांतला बरा होऊन, त्याला प्रफुल्लित पाहून आनंद झाला. लोकसेवा आणि जनकल्याणाच्या क्षेत्रात असेच काही क्षण अधिक परिश्रम करण्यास ऊर्जा, प्रेरणा देऊन जातात. वेदांतला पुढील वाटचालीसाठी खूप खूप आशीर्वाद व शुभेच्छा, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.