ड्रॅगन गिळू लागला...

    29-Mar-2024
Total Views |
Terror attacks

पाकवरील चिनी कर्जाचा बोजा दिवसेंदिवस वाढत असून, त्याखाली पाकिस्तान आधीच दबलेला. आता चिनी ड्रॅगन पाकला गिळण्याच्या तयारीत आहे. त्याचवेळी ‘सीपेक’ या चिनी प्रकल्पावर काम करणार्‍या, चिनी कामगारांवर दहशतवादी हल्ले घडवून आणले जात आहेत. त्यामुळे चीनसह पाकचे भवितव्य ठरवणार्‍या, या प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात आले आहे.

भारतात दहशतवादी कारवाया घडवून आणणारा, पाकिस्तान आज दहशतवादी कारवायांना बळी पडताना दिसतो. अर्थातच, भारत हा कोणत्याही दहशतवादाचे कधीही समर्थन करत नाही, ही भारताची भूमिका असून, त्याचा उच्चारही वारंवार केला गेला. नुकतीच एका आत्मघाती दहशतवाद्याने स्फोटकांनी भरलेली कार चिनी अभियंते आणि कामगारांना घेऊन जाणार्‍या वाहनावर धडकवली. या हल्ल्यात पाच चिनी नागरिक आणि एक पाकिस्तानी चालक ठार झाला. पाकमध्ये अशाचप्रकारे दहशतवाद्यांनी तेथील विकासकामांना लक्ष्य केलेले दिसून येते. गेल्या काही आठवड्यांत पाकिस्तानात झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला. यात नऊ चिनी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. आता घडलेला हल्ला खैबरपख्तुनख्वा प्रांतातील शांगला जिल्ह्यात घडला. जिथे पाकिस्तानच्या सर्वात मोठ्या जलविद्युत प्रकल्पाचे काम सुरू आहे. चिनी अभियंते दासू धरणाच्या दिशेने जात असताना, त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. चीनने या हल्ल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असून, त्यामुळे पाकिस्तान सरकारची चिंता वाढली आहे. मंत्र्यांव्यतिरिक्त पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी स्वत: चिनी दूतावासाला भेट दिली. सहसा पंतप्रधान कार्यालयात किंवा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात राजदूतांना संदेश देण्यासाठी बोलावण्याची परंपरा आहे; परंतु पाकमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्यानेच, तेथील पंतप्रधानांना स्वत: चिनी दूतावासात जावे लागले.

दहशतवाद हा दुधारी तलवारीसारखा आहे. पाकिस्तानने दहशतवाद्यांना बळ देऊ नये, असे भारताने त्याला वारंवार बजावले. मात्र, पाक ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही, हेच तेथील घटनांनी सिद्ध केले आहे. आता पाकला दहशतवादाबाबत गंभीर भूमिका घ्यावीच लागेल. जर चिनी नागरिकांना पुन्हा तेथे लक्ष्य केले गेले, तर पाकिस्तानचे सर्व आघाड्यांवर मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल. चिनी कर्जाचा अवाढव्य डोंगर तेथील सरकारच्या डोक्यावर यापूर्वीच आहे.‘चीन-पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर’ (सीपेक) प्रकल्पावर काम करणार्‍या चिनी नागरिकांवर नुकत्याच झालेल्या हल्ल्यांमुळे चिनी ड्रॅगनसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या प्रकल्पाचे भवितव्य धोक्यात आले आहे. भारताने युरोपला जोडणार्‍या ‘मध्य पूर्व इकोनॉमिक कॉरिडोर’ची जेव्हा घोषणा केली, तेव्हाच ‘सीपेक’ हा प्रकल्प संकटात सापडला होता. चिनी नागरिकांवरील हल्ल्यांचे वाढते प्रमाण पाहता, त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव चीनने मायदेशी बोलावून घेतले आहे. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी, कुशल मनुष्यबळाची कमतरता जाणवणार आहे. पाकमध्ये असलेले चिनी कामगार तसेच प्रकल्पांच्या संरक्षणासाठी अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करून, पाकने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलली असली, तरी त्यामुळे प्रकल्प पूर्ण होणार का, हा प्रश्न कायम राहतोच.
 
‘सीपेक’चे काम मंदावले असून, काही ठिकाणी ते पूर्णपणे थांबल्याचे दिसून येते. यामुळे प्रकल्पाचे वेळापत्रक तसेच त्याचा खर्च यांबाबत चीनला चिंता निर्माण झाली आहे. हा प्रकल्प चीनसाठी जसा महत्त्वाचा आहे, तसाच तो पाकसाठीही आहे. पाकची आर्थिक भरभराट यावर अवलंबून आहे. तसेच तेथे पायाभूत सुविधा उभारणे, परदेशी गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगार निर्माण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. मात्र, यासाठी झालेला विलंब तसेच आलेला व्यत्यय पाकिस्तानच्या आर्थिक वाढीवर तसेच रोजगार निर्मितीवर नकारात्मक परिणाम करणारा ठरणार आहे. मात्र, या प्रकल्पासाठी करण्यात आलेले भूसंपादन, त्यामानाने उपलब्ध रोजगाराच्या संधी आणि तेथील साधनसंपत्तीचे असमान वाटप ही पाकमधील जनतेची तक्रार आहे. पाकमधील स्थानिक समुदायाला विश्वासात न घेता, चीनने पाकला ओरबडण्याचे जे धोरण अवलंबले, त्याचा परिणाम म्हणून आज चिनी कामगारांवर दहशतवादी हल्ले होत आहेत.पाकिस्तानातील व्यवसाय तसेच कुशल कामगारांना चिनी प्रकल्पांचा फायदा होईल, याची खात्री पटवणे अत्यावश्यक आहे. पायाभूत सुविधांच्या उपक्रमांसोबत सामाजिक विकास प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केल्याने, स्थानिकांना त्याचा मूर्त लाभ मिळेल, याची खात्री करण्यात मदत होऊ शकते. सध्याची परिस्थिती चीन आणि पाकिस्तान या दोघांसाठीही आव्हानात्मक अशीच.

पाकिस्तानी जनतेची अशी भावना आहे की, चिनी प्रकल्पांचा त्यांना पुरेसा फायदा झालेला नाही. हा प्रकल्प चिनी कामगारांना रोजगार देत आहे. तसेच त्यासाठी लागणारी जमीन अयोग्यरित्या अधिग्रहित केली जात आहे, अशी त्यांची भावना. बलुचिस्तान जेथे हल्ले होत आहेत, तेथे फुटीरतावादी चळवळींचा इतिहास आहे. चीन स्वतःच्या हितांना प्राधान्य देत असून, फायदे सामायिक करत नाही, अशी भावना पाकमध्ये वाढीस लागली आहे. म्हणूनच तेथील जनतेची नाराजी अशा हल्ल्यांमधून उघड होताना दिसून येते.‘सीपेक’ या चीनच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे उद्दिष्ट चीनच्या शिनजियांग प्रांताला पाकिस्तानमधील ग्वादर बंदराशी जोडण्याचे आहे. पाकिस्तानच्या डोक्यावर चीनचे मोठ्या प्रमाणात कर्ज आहे, ज्यामुळे पाकचे चीनवरील अवलंबित्व तसेच संभाव्य शोषणाची चिंता वाढवली आहे. देशांतर्गत पायाभूत सुविधांचा विकास आणि आर्थिक वाढ यांसाठी पाक उपाय शोधतो आहे, ज्याची हमी चीनने दिली. यात चीनचा फायदा जास्त होणार असून, पाक निव्वळ कर्जाचा भार वाहणार आहे. बलुचिस्तानसारख्या अशांत भागात चिनी कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करणे, हे पाकी सरकारसाठी मोठे आव्हानात्मक ठरते आहे. २०१५ मध्ये हा प्रकल्प जेव्हा हाती घेतला गेला, तेव्हाच पाकमध्ये असंतोषाची बीजे पेरली गेली होती. कोट्यवधी डॉलरचा हा प्रकल्प म्हणूनच अनिश्चिततेच्या फेर्‍यात सापडला आहे. पायाभूत सुविधांची असलेली कमतरता आणि आर्थिक वाढीची दिसत असलेली संधी यांमुळे पाकने याकडे सुवर्ण संधी म्हणून पाहिले. चीनने मलाक्काच्या सामुद्रधुनीला पर्याय म्हणून तसेच नैसर्गिक साधनसुविधांनी समृद्ध अशा प्रदेशात प्रवेश करण्यासाठीची संधी म्हणून याचा विचार केला.

बलुचिस्तान प्रांतातून हा प्रकल्प जातो. येथे फुटीरतावादी चळवळींचा मोठा इतिहास आहे. काही बलुच गट याकडे पाकिस्तान सरकार आणि चीनने बळकावलेली जमीन म्हणून पाहतात, ज्यामुळे बंडखोरीची भावना प्रबळ होते. त्यांनीच चिनी कामगारांना हल्ले करून लक्ष्य केले आहे, त्यामुळे तेथे दहशतीचे वातावरण आहे. चीन याकडे फायदेशीर गुंतवणूक म्हणून पाहतो, तर पाकिस्तानी याला कर्जाचा सापळा मानतात. कर्जाची परतफेड करण्यात अपयशी ठरल्यास, पाकिस्तानला धोरणात्मक मालमत्तेवरील नियंत्रण गमवावे लागू शकते, अशी भीती आहे. म्हणूनच पाकिस्तान सरकार अडचणीत आले आहे. आर्थिक संकटातील देशांना कर्ज देऊन, चीन त्यांना आपल्या कह्यात ठेवतो, हा इतिहास. श्रीलंकेने त्याचा अनुभव नुकताच घेतला. त्याच्या सुदैवाने भारताने त्याला चिनी कर्जाच्या सापळ्यातून सोडवण्यासाठी त्वरेने हालचाली केल्या. अन्यथा, तेथील मोक्याची बंदरे चीनने केव्हाच बळकावली असती. चिनी विस्तारवादी धोरणाला पाक म्हणूनच बळी पडले असून, चिनी ड्रॅगन आता केव्हाही पाकचा घास घेईल, अशी परिस्थिती उद्भवलेली दिसते.