"आम्ही खिचडी चोराचा प्रचार करणार नाही"; ठाकरेंच्या उमेदवाराविरुद्ध काँग्रेसची भूमिका

    27-Mar-2024
Total Views |
 amol kirtikar
 (Sanjay Nirupam Vs Amol Kirtikar)
 
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरण्याआधीच ठाकरे गटाने लोकसभा निवडणुक २०२४ साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एकूण उबाठा गटाची १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. उबाठा गटाची यादी जाहीर होताच, महाविकास आघाडीत फुट पडली आहे. उबाठा गटाच्या उमेदवाराविरुद्ध काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे.
 
काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेत. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पुर्नउच्चार केला. अमोल किर्तीकर यांनी कोरोना काळात खिचडी चोरली आहे. अशा खिचडी चोराचा मी प्रचार करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
 
 
संजय निरुपम एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी काँग्रेस हायकमांडवर सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतचं संजय निरुपम यांनी आपल्या समोर सगळे पर्याय खुले असल्याचे जाहीर करुन, काँग्रेसच्या हायकमांडला इशारा दिला आहे. संजय निरुपम यांच्या आक्रमक भूमिकेनंतर ती काँग्रेस पक्षाला रामराम ठोकतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
 
संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांच्याविरोधात याआधी सुद्धा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांचा कोरोना काळातील कथीत खिचडी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्यासाठी संजय निरुपम उत्सुक होते. पण आता जागावाटपात हा मतदारसंघ उबाठा गटाकडे गेल्यामुळे संजय निरुपम काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
 
संजय निरुपम यांच्याबरोबरच उबाठा गटाने उमेदवारांची यादी जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे इतर नेते देखील नाराज झाले आहेत. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आघाडी धर्माच पालन करण्याचा सल्ला उबाठा गटाला दिला आहे. तर विजय वडेट्टीवार यांनी ठाकरेंनी आघाडी धर्माचं पालन केलं नाही, असा आरोप केला आहे.