लोकसभेसाठी आंबेडकर-जरांगे एकत्र? ठाकरे-पवारांची डोकेदुखी वाढली!

    27-Mar-2024
Total Views |
 ambedkar-jarange
 
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणात एक नवीन राजकीय समिकरण उदयास येत आहे. वंचित बहुजन आघाडी अधिकृतरित्या महाविकास आघाडीतून बाहेर पडून मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी महासंघासोबत आघाडी करण्याच्या तयारीत आहे. याविषयीची शक्यता खुद्द वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनीच बोलून दाखवली आहे.
 
प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ""मी काल मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. आम्ही त्यांच्या पाठिंब्याने महाराष्ट्रात उमेदवार देणार आहोत. याबात ३० मार्चला घोषणा केली जाईल." प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीवर जरांगे पाटलांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप देखील केला.
 
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "लोकसभा निवडणुकीमध्ये जरांगे पाटील फॅक्टरला दुर्लक्षित करुन चालणार नाही. आम्ही त्यांना जरांगेंना सोबत घेण्यास सांगितले होते. पण महाविकास आघाडीने आमच्या मागणीकडे दुर्लक्ष केले." महाविकास आघाडीची घोषणा करताना प्रकाश आंबेडकरांनी महाविकास आघाडीच्या घराणेशाहीवर देखील टीका केली.
 
महाविकास आघाडीच्या घराणेशाहीवर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ""ठाकरे-पवारांना 'वंचित'चा वापर घराणेशाही वाचवण्यासाठी करायचा होता, त्यांची घराणेशाही वाचवण्यास आम्ही नकार दिला आहे" प्रकाश आंबेडकरांच्या या आक्रमक भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
 
प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत सामील करुन घेण्यास उबाठा गट आणि शरदचंद्र पवार गट उत्सुक होते. पण जागा वाटपावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी वंचितला चार जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. तर वंचित आघाडीने सहा जागांची मागणी केली होती. ही मागणी पूर्ण न झाल्यामुळे वंचित आघाडी महाविकास आघाडीतून बाहेर पडली.