महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर? ठाकरेंच्या पहिल्या यादीवर नाराजी

    27-Mar-2024
Total Views |
 balasaheb thorat
 
मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटपाचे सूत्र ठरण्याआधीच उबाठा गटाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीसाठी एकूण १७ उमेदवारांची यादी जाहीर केली. उबाठा गटाची यादी जाहीर होताच, महाविकास आघाडीत फुट पडली आहे.
 
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आघाडी धर्माच पालन करण्याचा सल्ला उबाठा गटाला दिला आहे. तर मुंबई काँग्रेसचे मोठे नेते संजय निरुपम यांनी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात उबाठा गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांचा प्रचार करणार नसल्याचे जाहीर केले आहे.
 
 
संजय निरुपम यांनी मुंबई उत्तर पश्चिमची जागा उबाठा गटाला दिल्यामुळे काँग्रेस हायकमांडवर सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. त्यासोबतचं संजय निरुपम यांनी आपल्या समोर सगळे पर्याय खुले असल्याचे जाहीर करुन, काँग्रेसच्या हायकमांडला इशारा दिला आहे. संजय निरुपम यांच्या आक्रमक भूमिकेनंतर ती काँग्रेस पक्षाला रामराम ठोकतील अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
 
संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांच्याविरोधात याआधी सुद्धा भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. संजय निरुपम यांनी अमोल किर्तीकर यांचा कोरोना काळातील कथीत खिचडी घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप केला होता. मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवण्यासाठी संजय निरुपम उत्सुक होते. पण आता जागावाटपात हा मतदारसंघ उबाठा गटाकडे गेल्यामुळे संजय निरुपम काय भूमिका घेतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
 
मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाबरोबरच सांगली च्या जागेवरुन सुद्धा काँग्रेस आणि उबाठा गटात संघर्ष पाहायला मिळत आहे. सांगली हा काँग्रेसचा पारंपारिक लोकसभा मतदारसंघ आहे. या जागेवर उबाठा गटाने चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर काँग्रेसच्या विश्वास पाटील यांचा दावा आहे. विश्वास पाटील यांच्या उमेदवारीसाठी कोणत्याही पातळीवर जाऊ, असे आश्वासन काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी आधीच दिले होते, त्यामुळे सांगलीत काँग्रेसचे स्थानिक नेते कोणती भूमिका घेतात, हे पाहण उत्सुकतेचं ठरणार आहे.