नागपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे लोकसभा निवडणूकीला घाबरले आहेत. तसेच पराभवाच्या भीतीने त्यांनी पळ काढला आहे, अशी टीका भाजप नेते आशिष देशमुख यांनी केली आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
आशिष देशमुख म्हणाले की, "नागपूर लोकसभा लढलेले नाना पटोले इथून पळून गेलेले आहेत आणि आता ते स्वत:चा गृहजिल्हा असलेल्या भंडारा-गोंदियामध्येदेखील लोकसभा निवडणूक लढवण्यास घाबरत आहेत. तसेच विजय वडेट्टीवारदेखील चंद्रपूर जिल्ह्यतून लोकसभा निवडणूक लढवण्यास घाबरत असून हीच परिस्थिती नितीन राऊतांचीसुद्धा आहे."
हे वाचलंत का? - 'गुन्हेगार टिकवा, गुन्हेगारी वाढवा' हे काँग्रेसचे नवे धोरण!
"पटोले आणि वडेट्टीवार निवडणूकीतून काढता पाय घेत आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये पराजयाची मानसिकता भरलेली आहेत. म्हणूनच नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार हे लोकसभेच्या मैदानातून पळून जात आहेत. त्यांची पंढरी घाबरली आहे. त्यामुळेच ते लोकसभेत स्वत: उमेदवारी घेण्यास नकार देत आहेत. विदर्भात आणि महाराष्ट्रात नक्कीच भाजपचा विजय होईल आणि महायूतीला ४५ प्लस जागा मिळणार आहेत," असेही ते म्हणाले.
दरम्यान, एकीकडे चंद्रपूर लोकसभेवरुन विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या रुपाने काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. तर दुसरीकडे, नाना पटोले हे लोकसभा निवडणूक लढवण्यास फारसे इच्छूक नसल्याचे सांगण्यात येत आहे. यावरुनच आता आशिष देशमुखांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.