'गुन्हेगार टिकवा, गुन्हेगारी वाढवा' हे काँग्रेसचे नवे धोरण!

भाजप आमदार प्रविण दरेकरांचा घणाघात

    23-Mar-2024
Total Views |

Pravin Darekar 
 
मुंबई : गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा, हे काँग्रेसचे नवे धोरण आहे, असा घणाघात भाजप आमदार प्रविण दरेकर यांनी केला आहे. काँग्रेसने अकोल्यातील विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी गुन्हेगारी प्रवृत्ती असलेल्या साजिद खान पठाणला उमेदवारी जाहीर केली. यावर आता दरेकरांनी टीका केली आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
 
प्रविण दरेकर म्हणाले की, "काँग्रेस नेते राहुल गांधी एकीकडे भारत जोडो यात्रा काढत आहेत आणि दुसरीकडे त्यांचा पक्ष भारत तोडोची भाषा करणाऱ्याला उमेदवारी देत आहे. अकोला विधासभेच्या पोटनिवडणूकीसाठी काँग्रेसने साजिद खान पठाणला उमेदवारी दिली असून त्याच्यावर १६ वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे काँग्रेस भारत जोडोला नाही तर भारत तोडोला डोक्यावर घेणारा पक्ष झालेला आहे. 'काँग्रेस का हात दंगाबाजो के साथ' अशा प्रकारची काँग्रेसची भुमिका दिसतेय. 'गुन्हेगार टिकवा आणि गुन्हेगारी वाढवा', असे नवे धोरण काँग्रेसने आणले आहे," असे ते म्हणाले.
 
हे वाचलंत का? -  "...तर मी पक्षातून बाहेर पडेन"; विजय शिवतारेंचं मोठं विधान
 
ते पुढे म्हणाले की, "साजीद खान पठाण हा अकोल्यात झालेल्या दंगलीमागचा मुख्य आरोपी आहे. त्याच्याविरोधात रामदास पोलीस ठाण्यात गांजा विकणे आणि बाळगणे यासाठी २० (बी) एनडीपीएस कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याशिवाय कोतवाली पोलीस ठाण्यात दंगल घडवणे, घातक शस्त्राचा वापर करणे, बेकायदेशीर जमावाला एकत्रित करून हिंसा घडवणे, हल्ला करून पळून जाणे, शासकीय सेवकांवर हल्ला करून जखमी करणे अशी कृत्येदेखील पठाणने केली आहेत. त्यामुळे भारत जोडो बोलायचे आणि भारत तोडोची भाषा करणाऱ्यांना अधिकृत पक्षाची उमेदवारी द्यायची यावरुन काँग्रेसचे खरे रूप महाराष्ट्रातील जनतेसमोर येत आहे.
 
"मात्र, जनतेच्या न्यायालयात साजिद खान पठाण या उमेदवाराला त्याची जागा दाखवण्याचे काम अकोल्याची जनता निश्चितपणे करेल. काँग्रेसकडे थोडी जरी लाज उरली असेल तर त्यांनी १० वर्षाची शिक्षा भोगू शकणारी कलमं असणाऱ्या उमेदवाराची उमेदवारी मागे घेणार का? आणि जनतेच्या न्यायालयात जाईल का?" असा सवालही दरेकरांनी यावेळी केला आहे.