"...तर मी पक्षातून बाहेर पडेन"; विजय शिवतारेंचं मोठं विधान
23-Mar-2024
Total Views | 73
पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचण होत असेल तर मी पक्षातून बाहेर पडेन, असे विधान शिवसेनेचे नेते विजय शिवतारेंनी केले आहे. विजय शिवतारेंनी बारामतीतून पवारांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निश्चय केला आहे. ते शनिवारी इंदापूर दौऱ्यावर असून त्यांनी टीव्ही ९ मराठी या वृत्तवाहिनीशी संवाद साधला.
विजय शिवतारे म्हणाले की, "मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चर्चा केली आहे. त्यांनी इतर पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करुन ही जागा शिवसेनेला सोडली तर मला प्रचंड आनंद होईल. शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर ही निवडणूक लढावी आणि इतिहास घडावा अशी माझी ईच्छा आहे."
"माझे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे घनिष्ठ संबंध आहेत. पण हे २-४ महिने त्यांची अडचण झालेली आहे. मला निवडणूक लढवायची आहे पण महायूतीतून जागा मिळत नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत शिंदेंना अडचण होऊ नये यासाठी मी पक्षातून बाहेर पडेन," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "बारामतीत सुप्रिया सुळे आणि विजय शिवतारे म्हणजेच महाविकास आघाडी आणि अपक्ष अशी लढत होईल. आज एकीकडे सुप्रिया सुळे तर दुसरीकडे सुनेत्रा पवार उमेदवार आहेत. पण या दोघींनाही मत द्यायचं नसलं तर पर्याय काय? म्हणून लोकशाहीत महाराष्ट्रात जेव्हा लोकांना चांगला पर्याय मिळेल त्यावेळी निश्चितच इतिहास घडत जातील. आज लोकांची उत्सुकता शिगेला आहे. त्यामुळे लोकं स्वत:हून येतात. बारामतीत पवारांना पर्याय असावा यासाठी लोकांनीच लढा उभारला असून मी या लढ्याचा प्रतिनिधी आहे," असेही ते म्हणाले.