अखेर मुहूर्त ठरला! 'या' दिवशी आढळराव पाटील राष्ट्रवादीत जाणार
23-Mar-2024
Total Views | 73
मुंबई : शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश होत असून आढळराव पाटील यांना शिरुरमधून उमेदवारी मिळण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनिल तटकरे आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. येत्या २६ मार्च रोजी सायंकाळी आढळराव पाटलांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच त्यांना शिरुन लोकसभेची उमेदवारी मिळण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.
याविषयी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले की, "एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोघांशीही माझं बोलणं झालेलं आहे. ज्या अर्थी मी पक्षप्रवेश करतो आहे त्याअर्थी उमेदवारी निश्चित आहे का, असे बाळबोध प्रश्न विचारण्याची गरज नाही. मी १०० टक्के विजयी होणार आहे. मी आजपर्यंत ज्या निवडणूका जिंकलो आहे त्यानुसार ही निवडणूक सर्व निवडणूकांचे रेकॉर्ड तोडणार अशी मला आशा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्यासाठी तसेच केंद्रात अबकी बार चारसों पार आणि राज्यात मिशन ४५ राबवण्यासाठी आम्ही सगळे मतभेद बाजूला सारून एकदिलाने काम करणार आहोत."
यावेळी सुनिल तटकरे म्हणाले की, "२६ तारखेला संध्याकाळी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांचा मोठा पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आढळराव पाटील यांच्या पक्षप्रवेशावरून शिरुर लोकसभेच्या जागेबाबत तुम्ही अन्वयार्थ काढू शकता," असेही ते म्हणाले.