जागावाटपाबाबत बावनकुळेंचं सूचक विधान, म्हणाले, "केवळ ५ ते १०..."
23-Mar-2024
Total Views |
नागपूर : महायूतीच्या जागावाटपासंदर्भात केवळ ५ ते १० मिनिटांची चर्चा शिल्लक असून लवकरच जागावाटप निश्चित होणार आहे, असे वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. तसेच अमरावतीच्या जागेवर भाजपचाच उमेदवार लढणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली.
शनिवारी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "आमच्यात कोणताही तिढा नसून चर्चा सुरु आहे. ५ ते १० मिनिटांत संपेल एवढी चर्चा राहिली आहे. आमचे राज्याचे आणि केंद्रिय नेतृत्व यात पुढाकार घेऊन लवकरच निर्णय घेणार आहे. पाच मिनिंटात संपेल अशी चर्चा राहिली असून लवकरच जागावाटप पुर्ण होणार आहोत. अमरावती लोकसभेची जागा भाजपकडे असून इथे १०० टक्के भाजपचाच उमेदवार लढणार आहे. इथे लवकरच भाजपचा उमेदवार जाहीर होईल आणि महायूतीतील सर्व घटक पक्षांची आम्ही मदत घेऊन ही जागा जिंकणार आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "येत्या २ ते ३ दिवसांत सगळं चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणूकीमध्ये आम्ही बुथवर लक्ष केंद्रित केलं असून ५१ टक्के मतं मिळतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. मोदीजींच्या कल्याणकारी योजना आणि त्यांनी १० वर्षांत महाराष्ट्राला केलेल्या मदतीमुळे जनता त्यांना साथ देईल. मागच्या निवडणूकीपेक्षा ७ ते ८ टक्के मतं वाढतील अशी मला अपेक्षा आहे. महायूतीचे सर्व नेते एकत्र बसून चर्चा करणार आहोत. जिंकणे हा आमचा मुख्य उद्देश असून त्यासाठी लागणाऱ्या निकषांनुसार आम्ही लढणार आहोत," असेही ते म्हणाले.