नवी दिल्ली : 'तुम्ही आदेश पाळत नाही, अहंकारमध्ये राहता, तुम्हाला तुरुंगात पाठवू, अशा शब्दांत दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज यांना उच्च न्यायालयाने फटकारले. सामाजिक कार्यकर्ते बेजोन कुमार मिश्रा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मागील तारखेला याच सुनावणीदरम्यान न्यायालयाने दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज आणि दिल्लीचे आरोग्य सचिव एसबी दीपक कुमार यांना समन्स बजावले होते.
दरम्यान, आता न्यायालयाने याप्रकरणी सौरभ भारद्वाज आणि सचिव एसबी दीपक कुमार यांना फटकारले आहे. तसेच, न्यायालयीन आदेशांचे पालन न केल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयाने ताकीद दिली आहे. त्यांनी आदेशाचे पालन केले नाही आणि मग्रूर राहिल्यास जनहित लक्षात घेऊन न्यायालय त्यांना तुरुंगात पाठवण्यास मागेपुढे पाहणार नाही, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयानेही सौरभ भारद्वाज यांना फटकारतानाच आपल्या राजकीय लढ्यात न्यायालयाला प्यादे बनवू नका, असेही म्हटले आहे. उच्च न्यायालयाने म्हटले की, आम्ही न्यायाधीश असू शकतो, नेते नाही, पण नेते कसे विचार करतात हे आम्हाला चांगलेच ठाऊक आहे, अशा शब्दांत न्यायालयाने खडेबोल सुनावले आहेत.
सामाजिक कार्यकर्ते बेजोन कुमार मिश्रा यांनी दाखल केलेल्या जनहित याचिकांवर सुनावणी करताना न्यायालयाने म्हटले की, तुम्ही लोकसेवक आहात, त्यामुळे अहंकार बाजूला ठेवून जनहितानुसार निर्णय घ्या, असे म्हटले आहे. असे न केल्यास आवश्यकता म्हणून तुम्हाला तुरुंगात पाठवू आणि त्रयस्थ व्यक्तीला हे काम करण्यास सांगू, असे याचिकेवर सुनावणी करताना म्हटले आहे.