मास्टरमाईंड मुख्यमंत्री! घोटाळ्यातून केजरीवालांनी केली ६०० कोटींची कमाई!

    22-Mar-2024
Total Views |
AAP CM Arvind Kejriwal
 

नवी दिल्ली :     दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडीकडून मोठा आरोप करण्यात आला आहे. दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणाचे मास्टरमाईंड मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे असून त्यांनी सदर घोटाळ्यातून ६०० कोटींची कमाई केल्याचे आरोप ठेवण्यात आले आहेत. दरम्यान, २ तास चौकशी केल्यानंतर अरविंद केजरीवालांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर घोटाळ्याप्रकरणी अनेक मोठ खुलासे समोर येत आहेत. ईडीकडून दारु घोटाळाप्रकरणी सविस्तर तपशील न्यायालयात सादर करण्यात आला आहे. दिल्ली सरकारमधील मंत्र्याला दिलेल्या बंगल्यात दलाल राहत होता. त्याच्या माध्यमातून गोव्यातील आप उमेदवाराला ४५ कोटींची रक्कम देण्यात आल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले आहे.
 
हवालाच्या माध्यमातून ४५ कोटी रुपये गोव्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचे सांगतानाच गोव्यातील आप उमेदवाराला रोख रक्कम देण्यात आली असून ही रोकड या लाचेची रक्कम होती, असे सांगण्यात आले. ईडीने कोर्टात युक्तिवाद करताना अरविंद केजरीवाल हे दारु घोटाळ्याचे सूत्रधार असल्याचे म्हटले आहे. केजरीवाल यांना दि. २२ मार्च रोजी दिल्लीच्या राऊस एव्हेन्यू कोर्टात हजर करण्यात आले,


न्यायाधीश कावेरी रावत यांनी खटल्याची सुनावणी केली असून अतिरिक्त सॉलिसिटर जनरल (एएसजी) एसव्ही राजू यांनी ईडीची बाजू मांडली. दरम्यान, अरविंद केजरीवाल यांच्या कुटुंबीयांना अटकेबाबत माहिती देताना त्यांना रिमांडची प्रतही देण्यात आली असून, अटकेबाबत माहिती देण्यात आली आहे. ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या १० दिवसांच्या रिमांडची मागणी करताना सांगितले की, मद्य धोरणासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती, परंतु ती बनावट होती.

केजरीवाल यांच्यावर आरोप ठेवताना ईडीने म्हटले की, मद्य धोरणाच्या माध्यमातून लाच घेता येईल आणि मग लाच देणारे नफा कमवू शकतील अशा पद्धतीने तयार करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, अरविंद केजरीवाल हे दारू घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे एएसजीने स्पष्टपणे सांगितले. त्याचबरोबर, सदर धोरणाच्या निर्मितीत त्यांचा थेट सहभाग असून घोटाळाच्या माध्यमातून गोव्यातील निवडणूक प्रचारातही ते सक्रिय होते. या काळात ते तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या पूर्ण संपर्कातदेखील असल्याचे ईडीने न्यायालयात सांगितले.

ईडीने न्यायालयाला सांगितले की, विजय नायर, जे आपचे संपर्क प्रभारी देखील होते, ते अरविंद केजरीवाल यांच्या शेजारी राहत होते. ते राहत होते ते घर दिल्लीचे परिवहन मंत्री कैलाश गेहलोत यांना देण्यात आले होते. पण, कैलाश गेहलोत त्यांच्या नजफगडच्या घरात राहतात. तसेच, विजय नायर हे दारू माफिया आणि 'आप'च्या 'साउथ लॉबी' यांच्यात मध्यस्थ होते. ईडीच्या म्हणण्यानुसार, अरविंद केजरीवाल यांनी 'दक्षिण लॉबी' कडून मदत देण्याच्या बदल्यात लाच मागितली.